ऑनलाईन लोकमतनागपूर : अॅन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) भूमी अभिलेख कार्यालयात सक्रिय असलेल्या एका दलालाला लाच घेताना रंगेहात पकडले. बुधवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कार्यालय हादरले आहे.शैलेश पंढरीनाथ कापसे रा. संत गडगेबाबा सोसायटी मानकापूर असे आरोपीचे नाव आहे. तक्रारकर्ते शासकीय कर्मचारी आहेत. ते जरीपटका येथील सुगतगरात राहतात. त्यांना त्यांच्या भावाच्या टॅक्स पावतीमध्ये नामांतरण करायचे होते. यासाठी त्यांनी सिव्हील लाईन्स येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी ते कार्यालयात आले होते. तिथे त्यांची कापसेसोबत भेट झाली. कापसेने त्यांना त्यांची कार्यालयातील लिपीकासोबत ओळख असल्याचा हवाला देत काम करून देण्यासाठी सहा हजार रुपयाची लाच मागितली. लाच द्यायची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्यांनी एसीबी अधीक्षक पी.आर. पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याकडे तक्रार केली. प्राथमिक चौकशीत लाच मागितल्याचे आढळून आल्याने एसीबीने बुधवारी दुपारी त्याला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. आरोपीने दुपारी ४ वाजता तक्रारकर्त्यास पैसे घेऊन बोलावले होते. लाचेचे पैसे हातात घेताच कापसेला रंगेहात पकडण्यात आले.कापसे हा अनेक दिवसांपासून भूमी अभिलेख कार्यालयात दलाली करतो. येथे कापसे प्रमाणे अनेक दलाल सक्रिय आहेत. याच इमारतीमध्ये एसीबीचे कार्यालयही आहे. यानंतरही सर्रासपणे लाचखोरी सुरु आहे. तरीही पीडित एसीबीकडे तक्रार करीत नाही. कापसेने शासकीय कर्मचाऱ्याचा जवळचा व्यक्ती असल्याचे सांगून लाच मागितली होती. त्यामुळे त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई एसीबीचे अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक विजय माहूरकर, निरीक्षक भावना धुमाले, हवालदार भानुदास गीते, सुनील कलंबे आणि मनोहर डोईफोडे यांनी केली.