नागपूर : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने भांडेवाडीतील कुंभारपुरा येथील मूर्तिकार चिंधुजी गिरले यांचे घर मंगळवारच्या मध्यरात्री कोसळले. रात्री १२.३० वाजता ही घटना घडली तेव्हा सर्वजण झोपी गेले होते. कोसळलेल्या घराच्या मलब्यात सारेेच अडकून पडले. अखेर एकमेकांना आधार देत सर्वांनीच स्वत:ची सुटका या आपत्तीमधून करून घेतली.
गणेशोत्सव जवळ आल्यामुळे चिंधुजी गिरले यांच्या घरीसुद्धा मूर्तिकाम सुरू होते. या दुर्घटनेत घराच्या मलब्याखाली सापडून तयार केलेल्या मूर्ती नष्ट झाल्या. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा गिरले कुटुंबीयांनी केला आहे. चिंधुजी गिरले हे ८० वर्षांचे असून, घरात पत्नी पुष्पा, सून प्रतिभा व नातू तन्मय राहत होता. घर कौलारू होते व जीर्ण झालेले होते. दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने मंगळवारी मध्यरात्री सर्व झोपले असताना काही कौले चिंधुजी यांच्या अंगावर पडली व त्यात ते किरकोळ जखमी झाले. हळूहळू अख्खे छत खाली कोसळले; पण कुटुंबीयांनी लगेच स्वत:चा बचाव केल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. गोकुळाष्टमी व गणेशोत्सव असल्याने मूर्ती करून ठेवल्या होत्या. छत कोसळल्याने सर्व मूर्ती दबल्या.
अंगावरचे कपडे तेवढे वाचले
या दुर्घटनेत या कुटुंबाचे सर्वस्व हिरावले आहे. बुधवारी सकाळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी भेट देऊन पंचनामा केला. घरात अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच उरले नसल्याने या कुटुंबीयांने प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या शेजारच्या घरात तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी निवारा शोधला आहे.
...