नागपूर : राज्यात दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या लोडशेडिंगला आता आठवडा होत आला आहे, परंतु अजूनही कुठलाही टाइमटेबल तयार झालेला नाही. नागरिक आधीच त्रस्त आहेत. यातच महावितरण लोडशेडिंगच्या नावावर कधी-केव्हाही अर्धा ते दीड तासापर्यंत बत्ती गुल करीत आहे.
विशेष म्हणजे, दहा वर्षांपूर्वी जेव्हा लोडशेडिंग करण्यात आली होती. तेव्हा त्याचा एक टाइमटेबल ठरलेला होता. अर्धी लोडशेडिंग दिवसा व अर्धी सायंकाळी होत होती. राज्य नियामक आयोगाकडेही याची माहिती दिली जात होती, परंतु यावेळी सर्व परिस्थिती बदललेली आहे. कुठलीही वेळ निश्चित नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांचा असा तर्क आहे की, अचानक मागणी वाढली व पुरवठा कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने निर्णय घ्यावा लागला, परंतु आता तर एक आठवडा झाला आहे. महावितरणचे अधिकारीही म्हणत आहेत की, लाेडशेडिंग उन्हाळाभर राहील. अशा परिस्थितीत पूर्वी प्रमाणे लोडशेडिंगचे टाइमटेबल असणे आवश्यक आहे.
गुरुवारी मौदा व सावनेर येथील काही फीडरवर लोडशेडिंग करण्यात आली. अधा तास बत्ती गुल होती, परंतु नागरिकांना याची कुठलीही पूर्व माहिती देण्यात आली नव्हती. नागरिकांचे म्हणणे आहे की, किमान लोडशेडिंगची एक वेळ माहिती झाली, तर नियोजन करण्यास बरे राहील, परंतु महावितरण ऐकायला तयार नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, ही आपत्कालीन स्थिती आहे. लवकरच समस्या सोडविली जाईल. त्यामुळेच टाइमटेबल तयार नाही.
मौदा-सावनेरमध्ये बत्ती गुल
शुक्रवारी सकाळी मौदा व सावनेरमधील काही फीडरवर लोडशेडिंग झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. कंपनी सूत्रांचा असा दावा आहे की, जिल्ह्यातील १४ फीडरवर लोडशेडिंग होत आहे. अनेक ठिकाणी दुपारीही लोडशेडिंग करण्यात आली. दरम्यान, वीज खरेदी वाढल्याने परिस्थितीत थोडी सुधारणा झाल्याचा दावा महावितरणने केला आहे.
इंसुलेटर फेल, दक्षिण-पश्चिम नागपुरात अंधार
दक्षिण-पश्चीम नागपुरातील जयताळा व नेल्को सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री ९ वाजता अचानक बत्ती गुल झाली. यासोबतच रात्रीही लोडशेडिंग सुरू झाल्याची चर्चा पसरली, परंतु या संदर्भात महावितरणने स्पष्ट केले आहे की, इन्सुलेटर फेल झाल्याने वीज गेली होती. जवळपास ८ ट्रान्सफार्मर यामुळे ठप्प झाले होते. इन्सुलेटरची दुरुस्ती केल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला. दरम्यान, यामुळे सुभाषनगर, कामगार कॉलनीपासून तर जयताळापर्यंत अंधार पसरला होता.