जितेंद्र ढवळे, नागपूर: सद्यस्थितीत सामाजिक शास्त्र विषयातील ज्ञानात बदल होत आहे. इतिहासालादेखील भाषाशास्त्रीय, भौतिकशास्त्रीय वळण आले आहे. संकल्पना बदलत आहेत. त्यामुळे इतिहास म्हणजे काय, याचे विचारमंथन सुरू असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख व मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे इतिहास परिषदेच्या ५६ व्या अधिवेशनाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. याप्रसंगी डॉ. दीक्षित यांनी उपस्थितांशी संवाद साधला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. माजी महापौैर संदीप जोशी, इतिहास भाष्यकार प्रवीण योगी, जिजामाता महाविद्यालय बुलडाणा येथील प्राचार्य तथा परिषदेचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. प्रशांत कोठे, गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहास मंडळ अध्यक्ष डॉ. प्रकाश शेंडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ इतिहास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नामदेव ढाले, स्वागताध्यक्ष अधिष्ठाता डॉ. श्यामराव कोरेटी, परिषद सचिव डॉ. रवींद्र लोणारे, स्थानिक सचिव डॉ. रामभाऊ कोरेकर याप्रसंगी उपस्थित होते.
उद्घाटन समारंभात इतिहास परिषदेच्या अधिवेशनाची भूमिका अधिष्ठाता डॉ. श्यामराव कोरेटी यांनी विशद केली. प्रास्ताविक परिषदेचे सचिव डॉ. रवींद्र लोणारे यांनी केले. प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनीही यावेळी विचार मांडले. संचालन डॉ. रामभाऊ कोरेकर यांनी केले तर आभार डॉ. सचिन भोगेकर यांनी मानले.
काय म्हणाले दीक्षित?
- इतिहास हे महाकथन असून यात चार घटक मांडले जातात. हिस्ट्री ॲण्ड डिसीज हा इतिहासात नवीन कलाटणी देणारा विषय आहे.- कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतर इतिहासाची मांडणी वेगळी येईल असे ते म्हणाले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम विद्याशाखेस त्यांनी नवीन निर्मिती म्हणजेच इतिहासातील नवीन बंडखोरी असल्याचे म्हटले आहे.- आभासी इतिहास, नवखा इतिहास, फुरसती इतिहास, छंदिष्ट इतिहास, अशा नवनवीन रूपात इतिहास येत असल्याचेही ते म्हणाले.