लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्यात शब्द हे सर्वात महत्त्वाचे असतात. नवनवीन शब्द प्रत्येक भाषेत नित्य समाविष्ट होत असतात आणि होणेही आवश्यक आहे. कारण या शब्दांनीच भाषा आणि त्या भाषेचे साहित्य समृद्ध होत असते, असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने उर्दू साहित्यिकांच्या सत्कार समारोहात ते बोलत होते.बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे नुकताच आयोजित या सत्कार सोहळ्याच्या वेळी प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष गिरीश गांधी, कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, कराडचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रसिद्ध उर्दू साहित्यिक शरफुद्दीन साहिल प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात नागपूर व कामठीच्या १२ उर्दू साहित्यिकांना उर्दू साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये कवी लोकनाथ यशवंत यांच्यासह डॉ. अजहर हयात, डॉ. नाहीद अफरोज सुरी, अजहर असरार, जियाउल्ला खान लोधी, डॉ. शगुस्था आरीफ, इफ्तरवार नबावर, रियाझ अहमद अमरोधी, डॉ. नसीम अख्तर, डॉ. उबैद खारीन व मोहम्मद इकबाल सिद्दीकी यांचा समावेश आहे.अरुण गुजराथी यांनी हा सत्कार केवळ उर्दू साहित्यिकांचा नसून सर्वच भाषा साहित्यिकांचा गौरव असल्याचे मनोगत मांडले. उर्दू ही १५ भारतीय भाषांमधील सर्वात महत्त्वाची भाषा असल्याचे ते म्हणाले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, उर्दू ही सहज भाषा असून कुणीही नकळत तिच्या प्रेमात पडतो. हा उर्दू साहित्यिकांच्या सृजनशीलतेचा व प्रतिभेचा गौरव असल्याचे ते म्हणाले. डॉ. शरफुद्दीन साहिल यांनी, शायर साहिर लुधियानवी यांचे साहित्य रद्दीच्या दुकानात सापडल्याची खंत व्यक्त करीत साहित्याच्या संवर्धनाचे गरज व्यक्त केली. गिरीश गांधी यांनीही मनोगत मांडले. तसेच सत्कारमूर्ती साहित्यिकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.डॉ. मोहम्मद असदुल्ला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गायक मोहम्मद सलीम शेख यांनी आभार मानले.
नवनवीन शब्दांनी भाषा व साहित्य समृद्ध होते : अरुण गुजराथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 11:04 PM
नवनवीन शब्द प्रत्येक भाषेत नित्य समाविष्ट होत असतात आणि होणेही आवश्यक आहे. कारण या शब्दांनीच भाषा आणि त्या भाषेचे साहित्य समृद्ध होत असते, असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी केले.
ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे उर्दू साहित्यिकांचा सत्कार