लॅपटाॅप, संगणक, सीसीटीव्ही फुटेजच्या
माध्यमातून धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न-
डाॅ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरण : औषधी व रिकाम्या सिरिंजही ताब्यात
राजेश भोजेकर/लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा (चंद्रपूर): डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येमागील कारणांबाबत पोलिसांच्या हाती अद्याप काहीही ठोस लागले नसले तरी त्यांच्या कार्यालयातील संगणक, लॅपटाॅप व मोबाईल, तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहेत. आमटे कुटुंबीय अजून धक्क्यातून सावरले नसून लेकीने उचललेल्या टोकाच्या पावलाबद्दल कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
कर्मयोगी बाबा आमटे यांची नात, डाॅ. विकास आणि भारती आमटे यांची कन्या, महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या होऊन २४ तासांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरी पोलिसांच्या हाती कुठलाही ठोस पुरावा लागलेला नाही. पोलिसांनी त्यांच्या आनंदवनातील कार्यालयातून लॅपटाॅप, मोबाईल, संगणक यांसह औषधी व रिकाम्या सिरिंज वगैरे साहित्य ताब्यात घेतले आहे. शिवाय कार्यालयातील सीसीटीव्हीचे फुटेजही ताब्यात घेण्यात आले असून त्याची तपासणी सायबर सेलमार्फत केली जात आहे.
सोेमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास डाॅ. शीतल आमटे या घरात बेशुद्धावस्थेत आढळल्या. त्यांचे पती गौतम करजगी यांनी त्यांना लगेच वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांनी विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. मात्र अद्याप डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या मृत्यूमागील नेमक्या कारणांचा उलगडा झालेला नाही. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मात्र त्यांना कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्याचे तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. नीलेश पांडे यांनी सांगितले. दरम्यान, डाॅ. शीतल आमटे यांच्या कार्यालयातील लॅपटाॅप, त्यांचा मोबाईल, औषधी व रिकाम्या सिरिंजही ताब्यात घेतल्या आहेत. या माध्यमातून तपासाची दिशा मिळण्याची आशा डाॅ. नीलेश पांडे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. डाॅ. शीतल आमटे यांनी मानसिक तणावातून स्वत:चे आयुष्य संपविल्याचे बोलले जात आहे. त्यांना हा मानसिक तणाव नेमका कशाचा होता, ही बाब अद्याप अनुत्तरित आहे. याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान चंद्रपूर पाेलिसांपुढे आहे.
बाॅक्स
एकुलत्या मुलीच्या मृत्यूचा जबर धक्का
डाॅ. शीतल आमटे ही आमटे कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती. तिच्या अचानक मृत्यूचा आमटेे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. डाॅ. विकास व भारती आमटे यांना डाॅ. शीतल ही मुलगी व कौस्तुभ हा मुलगा, तर डाॅ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना दिगंत आणि अनिकेत ही दोन मुले त्यामुळे शीतल ही आमटे परिवारातील एकुलती एक लाडकी लेक होती. परंतु, अलीकडे शीतल आमटे ही एकाकी पडल्याचे आनंदवनातील मागील काही महिन्यातील घटनाक्रमावरून लक्षात येते. त्या असे टोकाचे पाऊल उचलतील, असे कुणालाही वाटत नव्हते. तिच्या या निधनाने आनंदवनाचा आनंदच हिरावल्याच्या भावना समाजमनात व्यक्त होत आहे.
नाना पाटेकरांकडून आमटे कुटुंबीयांचे सांत्वन
‘डाॅ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटामुळे सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचे आमटे कुटुंबीयांशी अतिशय जवळचे नाते निर्माण झाले असून आमटे कुटुंबीयांच्या सुख-दु:खात ते सहभागी असतात. डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूची वार्ता कळताच नानांनाही जबर धक्का बसला. त्यांनी आमटे कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केल्याची माहिती आहे. मात्र या बाबीला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.