नागपूर : वन विभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला जखमी पक्ष्यांना उपचारादरम्यान उडता यावे यासाठी एक मोठा पिंजरा भेटीदाखल मिळाला आहे. विशेष म्हणजे, कॅनडाच्या युवतीने तो भेट दिला आहे.
येथे जखमी पक्ष्यांना उपचारासाठी आणले जाते. प्रकृती सुधारल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. मात्र पिंजरे लहान असल्याने उपचाराच्या काळात त्यांना उडण्यासाठी त्रास होतो, ते भरारी घेऊ शकत नाहीत. अशातच, एक दिवस सेंटरमध्ये उपचारासाठी जखमी पक्षी सोडण्यासाठी कॅनडातील बिन्नी नामक युवती आली. पक्ष्यांची अडचण तिच्या लक्षात आली. पक्षिप्रेमी असलेल्या बिन्नीने सृष्टी पर्यावरण संस्थेचे सचिव विनीत अरोरा आणि वाईल्ड लाईफ वार्डन कुंदन हाते यांच्याकडून समस्या समजून घेतली. स्वत:च्या खर्चातून जखमी पक्ष्यांसाठी एक मोठा पिंजरा (बर्ड एव्हियरी) देण्याची तयारी दर्शविली. विनीत यांच्या मदतीने एक मोठा पिंजरा तयार करून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला भेट दिला. याचे लोकार्पण मंगळवारी सायंकाळी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या हस्ते झाले.