लहान वाहनापेक्षा मोठ्या वाहनचालकाची जबाबदारी अधिक; उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 07:22 PM2021-12-14T19:22:26+5:302021-12-14T19:23:05+5:30
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एसटी बस व ट्रॅक्समधील अपघाताच्या प्रकरणामध्ये लहान वाहनापेक्षा मोठ्या वाहचालकाची जबाबदारी अधिक असते, असे स्पष्ट करून अपघात पीडितांना ३ लाख ५० हजार रुपये भरपाई मंजूर केली.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एसटी बस व ट्रॅक्समधील अपघाताच्या प्रकरणामध्ये लहान वाहनापेक्षा मोठ्या वाहचालकाची जबाबदारी अधिक असते, असे स्पष्ट करून अपघात पीडितांना ३ लाख ५० हजार रुपये भरपाई मंजूर केली. न्यायमूर्ती महेश सोनक यांनी हा निर्णय दिला.
ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. राजुरा येथील विलास बेले हे १२ नोव्हेंबर १९९७ रोजी ट्रॅक्स चालवित असताना पुढे असलेल्या एसटी बस चालकाने अचानक उजवीकडे वळण घेतले. त्यामुळे बेले यांच्या ताब्यातील ट्रॅक्स पुलाच्या खाली कोसळली. या अपघातात बेले यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी वनिता बेले व इतरांनी पाच लाख रुपये भरपाई व त्यावर १८ टक्के व्याज मिळण्याकरिता सुरुवातीला मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. २० डिसेंबर २००६ रोजी तो दावा नामंजूर करण्यात आला. एसटी बस चालकाने निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाले नाही, असे कारण हा निर्णय देताना नमूद करण्यात आले. परिणामी, वनिता बेले व इतरांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता न्यायाधीकरणचा वादग्रस्त निर्णय रद्द करून पीडितांना संबंधित भरपाई व भरपाईच्या रकमेवर २८ फेब्रुवारी २००० पासून ६ टक्के व्याज मंजूर केले.
भरपाईचा दावा फौजदारी नसतो
अपघात भरपाईचा दावा फौजदारी स्वरूपाचा नसतो. यामध्ये दिवाणी जबाबदारी निश्चित करावी लागते. त्यामुळे अपघातास कारणीभूत व्यक्तीचा निष्काळजीपणा सिद्ध करण्याची गरज नाही, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले.