रेवराल : माैदा शहरातील वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये घरगुती नळाच्या पाण्यात चक्क अळ्या आढळून आल्या. यामुळे नागरिकांच्या आराेग्यास धाेका निर्माण झाला असून, या गंभीर प्रकाराकडे नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
शहरातील वाॅर्ड क्रमांक ६, रामनगर भागात गेल्या महिनाभरापासून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच पिण्याच्या पाण्यात चक्क अळ्या आढळून आल्याने नागरिक कमालीचे संतापले आहेत. विशेषत: शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सुमारे ४५ वर्षे जुनी आहे. बहुतांश भागात ही पाईपलाईन सांडपाण्याच्या नालीमधून गेली आहे. पाईपलाईन लिकेज हाेऊन नालीतील दूषित पाणी पाईपलाईनद्वारे नळांना येत आहे. नालीतील दुर्गंधीयुक्त पाणी तसेच पाण्यात अळ्या आढळून आल्याने नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून नगर पंचायत प्रशासनाने तात्काळ उपाययाेजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.