नागपूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे (सदनिका)वाटप रद्द करण्यात आलेले होते व ज्या लाभार्थ्यांच्या सदनिकेची प्रतीक्षा यादी कार्यान्वित झालेली नाही अशा सर्व लाभार्थ्यांकरिता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सदनिका वाटपाची शेवटची संधी देण्याचे ठरविले आहे.
एनएमआरडीएतर्फे पीएमएवाय अंतर्गत लाभार्थ्यांना मौजा तरोडी (खुर्द) मध्ये ख. क्र. ६३ व ख. क्र. ६२ तसेच मौजा वांजरी मध्ये ख. क्र. १२/१-२ येथील एहर सदनिकेचे वाटप करण्यात आलेले होते. तथापि, वाटप केलेल्या लाभार्थ्यांना गृहकर्ज वा इतर कारणामुळे नेमून दिलेल्या मागणीपत्रकाची रक्कम मुदतीत देय केलेली नाही अशा लाभार्थ्यांचे सदनिका वाटप प्रस्ताव एनएमआरडीव्दारे रद्द करून प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
वाटपपत्राची रक्कम जमा न करू शकलेल्या लाभार्थ्यांना वाटपपत्राची रक्कम देय करून सदनिका घ्यावयाची असल्यास त्यांनी गोकूळपेठ येथील नासुप्र संकुलच्या प्रधानमंत्री आवास योजना कक्षात ३१ मार्चपर्यंत आपण मागणीपत्राची रक्कम देय करू शकतो, असे अर्जासह विनंतीपत्र दिल्यास सदर लाभार्थ्यांना प्रतीक्षा यादी तपासून सदनिका वाटपासाठी उपलब्ध असल्यास नव्याने मागणीपत्रक निर्गमित करण्यात येईल, अन्यथा सदर सदनिका नवीन लॉटरीसाठी प्रस्तावित करण्यात येईल. याचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एनएमआरडीए आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.