नाना पटोले यांना नवीन वकिलासाठी शेवटची संधी; नितीन गडकरी यांच्याविरुद्धचे प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2022 09:24 PM2022-08-12T21:24:59+5:302022-08-12T21:25:34+5:30
Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी नवीन वकील नियुक्त करण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शेवटची संधी म्हणून तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला.
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी नवीन वकील नियुक्त करण्याकरिता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना शुक्रवारी शेवटची संधी म्हणून तीन आठवड्यांचा वेळ देण्यात आला.
नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे. पटोले यांच्या वतीने ॲड. सतीश उके या याचिकेचे कामकाज पाहत होते. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केल्यामुळे ॲड. उके सध्या कोठडीत आहेत. पटोले यांनी त्यांच्या जागेवर गेल्या अनेक दिवसांपासून नवीन वकिलाची नियुक्ती केली नाही. परिणामी, त्यांना यासाठी शेवटची संधी देण्यात आली. याचिकेवर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत भ्रष्ट व्यवहार केल्यामुळे गडकरी यांची निवड रद्द करण्यात यावी, असे पटोले यांचे म्हणणे आहे, तसेच त्यांनी स्वत:ला विजयी घोषित करण्याची मागणीही निवडणूक याचिकेत केली आहे.