नागपूर : ‘राईट टू गिव्ह अप हा पर्याय निवडून ज्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अश्या विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे आपले अर्ज दुरुस्त करून ते पुन्हा सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून विविध मॅट्रिकोत्तर भारत सरकार शिष्यवृत्तीची अर्ज प्रक्रिया महाडिबीटी पोर्टलवरून राबविण्यात आली आहे. यंदाच्या वर्षापासून महाडिबीटी पोर्टलवर राईट टू गिव्ह अप अर्थात शिष्यवृत्तीवर हक्क सोडण्याचा अधिकार हा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. हा नवीन पर्याय जरी ऐच्छिक होता तरी, अनेक विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप या पर्याय चूकून निवडला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मूकावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. “राईट टू गिव्ह अप” हा पर्याय चूकीने निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अनावधानाने अथवा नजरचुकीने हा पर्याय निवडून त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज रद्दबातल झाले असतील केवळ अश्या विद्यार्थ्यांना राज्यशासनातर्फे ३० जूनपर्यंत अंतिम संधी देण्यात आलेली आहे. अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून ऑनलाईन सादर करावेत.
आपल्या प्राचार्यांशी साधा संपर्क
याबाबत विद्यार्थ्याने आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून महाविद्यालयांच्या प्राचार्य लॉगिन मधून आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून घेणे आवश्यक आहे. रिव्हर्ट बॅक (Revert Back) झालेला अर्ज विहित वेळेत विद्यार्थ्याच्या लॉगिन मधून ऑनलाईन फेर सादर करणे आवश्यक राहील. विहित वेळेत विद्यार्थ्याने अर्ज फेर सादर न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्याची राहील तेव्हा लवकरात लवकर अर्ज सादर करावे, असे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.