लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या ६७ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अखेरच्या सत्रात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात यावा, असा ठराव घेण्यात आला. एकूण पाच ठराव घेऊन या दोन दिवसीय संमेलनाची सांगता झाली. अध्यक्षीय भाषणातून संमेलनाध्यक्षांनी हाच मुद्दा मांडला होता. ठरावांवर त्यांच्या मनोगताची मोहोर उमटलेली दिसली.
समारोपीय सत्राचे प्रमुख अतिथी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. खासदार कृपाल तुमाणे यांच्या उपस्थितीत समारोपीय सत्र झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. मधुकर जोशी यांच्यासह संमेलनाच्या कार्यध्यक्ष डॉ. आरती मोगलेवार, गणेश मायवाडे आदींची उपस्थिती होती. समारोपीय सत्रानंतर झालेल्या खुल्या अधिवेशनात मुख्य संयोजन डॉ. गणेश चव्हाण यांनी पाच ठराव मांडून पारित करण्यात आले. यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासह मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाकडून अनुदान मिळावे, बोलीभाषेत होणाऱ्या साहित्य संमेलनांना कायमस्वरूपी अनुदान मिळावे व तशी तरतूद अर्थसंकल्पात व्हावी, नवोदितांच्या साहित्यकृतीला शासनाकडून मदत मिळावी आणि सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मराठी भाषाविषय आवश्यक म्हणून बंधनकारक करावा या ठरावांचा समावेश होता.
तामिळांचा हिंदीला विरोध वरपांगी - मधुकर जोशी
संमेलनाध्यक्ष डॉ. मधुकर जोशी म्हणाले, तामिळी जनतेला त्यांची भाषा जगातील सर्वश्रेष्ठ वाटते. ते हिंदीलाही विरोध करताना दिसतात. मात्र, त्यांचा हा विरोध वरपांगी आहे. तेथे हिंदी चित्रपटांना होणारी गर्दी आपण स्वत: पाहिली आहे. हिंदी चित्रपट चालतात, मग हिंदीला विरोध कशासाठी ? तामिळी जनता आपली भाषा सर्वश्रेष्ठ मानतात. मात्र, त्यांच्या साहित्याचा अभ्यास मराठी साहित्यिकांनी अपवाद वगळता केलेला दिसत नाही. याउलट कसल्याही आश्रयाशिवाय संत साहित्यातून मराठी साहित्य संतांनी सात राज्यांत पोहोचविले. भोसल्यांनी मराठी नाटकांचे लेखन केले. मराठीला संपर्क भाषेचा दर्जा मिळण्याच्या मुद्द्याचा त्यांनी पुनरुच्चार करून साहित्य संस्थांनी आग्रही भूमिका घेण्याचे आवाहन केले.
उन्नत शेतीसाठी गटशेतीकडे वळा : डॉ. निंबाळकर
डाॅ. शरद निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘उद्याची उन्नत शेती’ या विषयावर झालेल्या परिसंवादात ते म्हणाले, पोटात आग असेल तरच कविता जन्माला येतात. मात्र आता मातीपासून दूर राहा असे मुलांना सांगणारे पालक शहरात आहेत. देशात सर्वाधिक पिकाऊ जमीन असली तरी, ती वाटण्यांमुळे तुकड्यात विभागली गेली आहे. उन्नत शेतीसाठी गटशेतीकडे वळण्याचा सल्ला त्यांनी दिला. जयदीप सोनखासकर म्हणाले, शेतीचे जग आनंददायी असले तरी, शेतकरी आत्महत्यांनी ते भीतीदायक बनले आहे. गाय, गोबर आणि बकऱ्यांचे महत्त्व पटविण्याची गरज आहे. अनंत भोयर म्हणाले, शासकीय कर्मचाऱ्यांना आयोग मिळतो, पण शेतकऱ्यांचे काय? त्यांच्या शेतमालाच्या दराचा विचार कोणी करत नाही.
संत साहित्यातील बंडखोरी सामाजिक : प्रकाश एदलाबादकर
‘संत साहित्यातील बंडखोरी आणि प्रयोगशिलता’ या विषयावरील चर्चासत्रात अध्यक्ष प्रकाश एदलाबादकर म्हणाले, ती बंडखोरी सामाजिक होती. त्यातून समाजाचे कल्याणच झाले. संतांनी निर्माण केलेल्या वाङ्मयातून त्यांचे जीवन प्रतिबिंबित होते म्हणून ते टिकाऊ आहे. डॉ. बाळ पडवळ म्हणाले, संतांनी रूढी, परंपरांवर नव्हे, तर कुप्रथांवर आसूड ओढले. म्हणून संस्कृती मजबूत आहे. पद्मरेखा धनकर म्हणाल्या, संतांनी पलायनवाद सांगितला नाही. त्यांनी घडविलेली क्रांती विध्वसंक नव्हे, तर विधायक आहे. राजन जयस्वाल म्हणाले, संतांचे कार्य समाज घडविण्यास हितकारक असून, मानवतेच्या मार्गावरून चालण्यास प्रवृत्त करणारे आहे.
खासदार तुमाने म्हणाले, मनाची जडणघडण करण्यासाठी साहित्य संमेलनांची गरज आहे. अलीकडे ही संख्या रोडावली आहे. कवी, वक्ते आणि नेते निर्माण करणारे हे व्यासपीठ आहे. यामुळे या आयोजनांची नितांत गरज आहे.
मोजक्या उपस्थितीत झालेल्या या समारोपीय समारंभात आयोजक संस्थेने वि. सा. संघाचे सचिव प्रदीप दाते आणि रत्नाकर ठवकर यांचा सत्कार केला, तर विदर्भ साहित्य संघाच्या वतीने आयोजकांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन मधुरा भड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. उल्हास मोगलेवार यांनी मानले.