गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीपी) निर्देश दिले असतानाही जिल्ह्यातील चिचोली व चनकापूर येथील सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प (एसटीपी) अद्याप रखडला आहे. या प्रकल्पासाठी वेळोवेळी सर्व्हे व आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला. मात्र अद्याप कामाला सुरुवातच झाली नाही. आता पुन्हा या प्रकल्पासाठी सुधारित डीपीआर तयार करून जिल्हा परिषद शासनाला निधी मागणार आहे.
चिचोली व चनकापूर या गावांतील लाखो लिटर सांडपाणी लगतच्या कोलार नदीत सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषित होत आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रीया करण्याचे आदेश जून २०२० मध्ये एनजीपीने जिल्हा परिषदेला दिले होते. परंतु चार वर्षानंतरही हा प्रकल्प मार्गी लागला नाही. कधी जागेचा अभाव तर कधी निधी नसल्याने हा प्रकल्प रखडला.
सुरुवातीला जिल्हा परिषदेने प्रकल्प आराखडा तयार करून ३.५६ कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविला होता. परंतु यासाठी निधी मिळाला नाही. एमपीसीबीकडून निधी उपलब्ध न झाल्यावर जि.प.कडील पाणी व स्वच्छता विभागाने उपलब्ध निधीतून ‘लो कॉस्ट’ ट्रिटमेंट प्लांटसाठीही प्रयत्न केले. याकरिता नीरीची मदत घेण्यात आली. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. यावर तोडगा काढण्यासाठी व निधीसाठी प्रयत्नही केले. परंतु यातून मार्ग निघाला नाही. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेत नांदेडच्या धर्तीवर सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारण्याची सूचना केली. त्यानुसार एका एजन्सीने चिचोली येथील जागेचा सर्व्हे केला. मात्र त्यानंतर प्रक्रीया पुढे सरकली नाही. आता पुन्हा एकदा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (युईवआय)संस्थेच्या माध्यमातून डीपीआर तयार केला जाणार आहे.
दंड आकारण्याचा दिला होता इशारा
प्रकल्पासाठी चिचोली येथील ०.९९ हेक्टर आर जागा निश्चित केली आहे. मार्च २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण न केल्यास जि.प.ला महिन्याला ५ लाखांचा दंड भरण्याची तयारी ठेवा असा इशारा एनजीपीने दिला होता. परंतु त्यानंतरही हा प्रकल्प मार्गी लागला नाही. सोबतच नदीचे प्रदूषणही थांबलेले नाही.