नागपूर : रुजले तेव्हा ते इवलेसे राेपटे असेल. आता दिसणारे सिमेंटचे जंगल तेव्हा कुठे असेल? तेव्हा तर जंगल असेल आणि आसपास त्याच्याप्रमाणेच हिरवे साेबती असतील. अशा स्थितीत अनेक उन्हाळे, पावसाळे सहन करून ते वाढले, विशाल झाले. असंख्य पक्षी, किड्या मुंग्यांचा ते आधार झाले. माणसेही त्याच्या सावलीत बसले असतील. पाहता पाहता २०० पेक्षा जास्त वर्षे लाेटली. या काळात या पुराणपुरुषाने सीताबर्डीचे, नागपूरचे बदलणारे रूप अनुभवले असेल. त्याच्या अवतीभवती सिमेंटच्या अनेक इमारती उभ्या राहिल्या. यात त्याच्या कित्येक साेबत्यांचा बळीही गेला असेल. आता त्याचाही नंबर आला. इमारतीच्या बांधकामासाठी माणसांना ताे अडथळा ठरत आहे. त्यालाही कापण्याचे फर्मान निघाले आहे. या पुराणपुरुषाची ही अखेरची घरघर असेल.
हा प्रवास सीताबर्डी भागातील २०८ वर्षे जुन्या पिंपळाच्या वृक्षाचा आहे. स्थानिकांच्या मते ते त्यापेक्षा वृद्ध आहे. भाेसले वाड्याला लागूनच हे झाड आहे. सीताबर्डीच्या गजबजलेल्या परिसरात हा विशाल वृक्ष उभा आहे. एका व्यक्तीने निवासी इमारतीच्या बांधकामासाठी झाडाचा अडथळा हाेत असल्याने ते कापण्याची परवानगी द्यावी म्हणून महापालिकेच्या उद्यान विभागाकडे अर्ज केला आहे. त्यानुसार महापालिकेने हे झाड ताेडण्याबाबत कुणाला हरकत असल्यास सात दिवसांच्या आत उद्यान विभागाकडे आक्षेप नाेंदविण्याचे आवाहन केले आहे. वयानुसार हे झाड हेरिटेज वृक्षामध्ये माेडले जाते. त्यामुळे पुढची प्रक्रिया राज्य प्राधिकरणाला करावी लागणार आहे. मात्र, हे पुराणवृक्ष ताेडण्यावरून पर्यावरणप्रेमींनी खंत व्यक्त करीत आक्षेप घेतला आहे.
गजानन महाराज झाडाखाली बसले हाेते
एका स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या मते हे झाड जवळपास ३०० वर्षे जुने आहे. कधी हे भाेसले वाड्याची शान हाेते. उल्लेखनीय म्हणजे गजानन महाराज नागपूरला आले असता, याच झाडाखाली काही वेळ बसले हाेते व त्यानंतर ते बुटी वाड्याकडे रवाना झाले. मात्र, पूर्ण झाडच ताेडले जाणार नसून वीज तारांना लागणाऱ्या केवळ फांद्या ताेडल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्य प्राधिकरणाकडे वर्ग करणार
झाडाचे वय २०० वर्षांपेक्षा अधिक आहे. विभागाला आलेल्या अर्जानुसार जाहिरातीद्वारे सूचना व आक्षेप मागविले आहेत. मात्र, नव्या नियमानुसार हे झाड हेरिटेज गटात माेडत असल्याने पुढच्या प्रक्रियेसाठी राज्य वृक्षसंवर्धन प्राधिकरणाकडे वर्ग केले जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक अमाेल चाैरपगार यांनी दिली.