सुमेध वाघमारे
नागपूर : असुरक्षित तसेच अनैतिक शारीरिक संबंधांमुळे राज्याच्या उपराजधानीत गर्भपाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरातील शासकीयसह खासगी गर्भपात केंद्रांवर २०२२ मध्ये १२,१३० महिलांनी गर्भपात केले. यात विवाहित महिलांची संख्या ११,७६२ तर कुमारिकांची संख्या ३६८ एवढी आहे.
मातृत्व हे महिलेला मिळालेले वरदान; पण हे मातृत्व नको असताना किंवा इच्छा नसताना लादलेले असेल तर मातृत्वाचा निर्णय त्या महिलेला घेण्याचा अधिकार आहे. सुरक्षित आणि कायदेशीररित्या गर्भपात करण्यासाठी सर्व महिला पात्र असतात. त्यासाठी विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कुठलाही भेदभाव करणे असंवैधानिक असल्याचे सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले आहे. नोकरी व करिअरसाठी गर्भपात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-खासगीमध्ये ११,४८० महिलांचे गर्भपात
नागपूर शहरात गर्भपाताची २३१ केंद्रे आहेत. यातील ७ शासकीय तर २२४ खासगी केंद्रे आहेत. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत १२,१३० महिलांनी गर्भपात केले. यातील ११,४८० महिलांनी खासगी केंद्रांवर तर, ६५० महिलांनी शासकीय केंद्रांवर गर्भपात केले.
-गर्भधारणेच्या १२व्या आठवड्यात सर्वाधिक गर्भपात
अविवाहित महिलेनं परस्पर संमतीने ठेवलेल्या शरीरसंबंधांनंतर गर्भधारणा झाली असल्यास तिला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मागील वर्षी नागपूर शहरात गर्भधारणेच्या १२व्या आठवड्यात सर्वाधिक म्हणजे, ११,०८८ गर्भपात झाले. १३ ते २० आठवड्यात ९६० गर्भपात झाले. ८२ गर्भपात कोणत्या आठवड्यात झाले याची माहिती उपलब्ध नाही.
-कायदेशीर गर्भपाताची कारणे
:जर गर्भवती मातेच्या जीवाला धोका असल्यास किंवा गर्भवती मातेला मानसिक किंवा शारीरिक आरोग्यास गंभीर इजा, दुखापत होत असल्यास गर्भपात करता येतो.
:जर नवजात बालकास जन्मानंतर मानसिक किंवा शारीरिक व्यंग असल्यास त्यामुळे बालकास अपंगत्व येणार असेल तर गर्भपात करता येतो.
:जर महिलेला/कुमारिकेला बलात्कारामुळे गर्भधारणा झालेली असेल, गर्भपात करता येतो (महिलेच्या मानसिक आरोग्याला जबर धक्का बसल्याचे गृहित धरुन)
:विवाहित महिलेकडून किंवा तिच्या पतीकडून गर्भनिरोधक साहित्याच्या किंवा औषधांच्या निष्क्रियतेमुळे गर्भधारणा झाल्यास गर्भपात करता येतो.
-गर्भपात करताना वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा
असुरक्षित गर्भपातामुळे रक्तस्त्राव, गर्भाशयाला इजा होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. वंध्यत्वाचीही जोखीम असते. यामुळे अधिकृत वैद्यकीय तज्ज्ञाकडूनच गर्भपात करणे आवश्यक आहे. गर्भपात औषधी देऊन व सर्जिकल या दोन प्रकारातून करता येते. यातही अधिकृत वैद्यकीय तज्ज्ञांकडूनच औषधी घ्यावीत. यामुळे गुंतागुंत निर्माण होत नाही.
-डॉ. सुषमा देशमुख, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ