लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजन : सावनी रवींद्र यांचे सुरेल सादरीकरण नागपूर : लतादीदी आणि आशा भोसले म्हणजे रसिकांच्या गळ्यातील ताईतच. या दोघीही मराठी भाषिक असल्याने त्यांच्या आवाजातील अनेक मराठी गीते रसिकांच्या वाट्याला आली, हे रसिकांचे भाग्यच आहे. त्यांनी गायिलेली अनेक गीते केवळ लोकप्रियच नाही तर अजरामर झाली आहेत. अनेक पिढ्यांना वेड लावणाऱ्या त्यांच्या आवाजातील गीते ऐकण्याचा योग म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच. वन्समोअरची दाद देत आणि टाळ्यांचा प्रतिसाद देत रसिकांनी ‘लताशा’ हा कार्यक्रम शुक्रवारी एन्जॉय केला. लोकमत आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने दुर्गोत्सवात आठ रस्ता चौक, व्हॉलिबॉल प्रांगण येथे सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले. सावनीने यावेळी गगन सदन, धुंद मधुमती, थकले रे नंदलाला, श्रावणात घननिळा, तुझ्या गळा माझ्या गळा, घनतमी शुक्र बघ, जिवलगा राहिले रे.., मालवून टाक दीप, तरुण आहे रात्र अजूनी आदी गीतांनी रंगत आणली. गोड गळा, स्पष्ट उच्चार आणि संगीताची जाण हे सावनीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच गीतांचा भाव नेमकेपणाने रसिकांपर्यंत पोहोचविण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला. सावनीला गायनात सहसंगत नागपूरच्या मुकुल पांडे यांनी केली तर वाद्यसंगत अमृता केदार, नितीन शिंदे, आनंद मास्टे, प्रसन्न बॉम्ब, उज्ज्वला गोकर्ण, अक्षय हरले यांनी केली. निवेदन श्वेता शेलगावकर आणि प्रमोद पवार यांचे होते. संहिता प्रवीण जोशी यांची होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसन्न मोहिले, मानसी इंगळे, आनंद काजगीकर आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
‘लताशा’ लतादीदी आणि आशातार्इंच्या गीतांचा गुलदस्ता
By admin | Published: October 17, 2015 3:26 AM