लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व जलक्रांतीचे जनक स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या राज्यसरकारच्या पहिल्या जलभूषण पुरस्काराच्या विजेत्यांमध्ये विदर्भातून कंत्राटदार संघटनेच्या माजी अध्यक्षांची निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्व. चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेला हा पहिलाच पुरस्कार वादात अडकण्याची शक्यता आहे. प्रवीण महाजन हे कंत्राटदार असल्याला जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला व निवड चुकल्याचे अप्रत्यक्षरीत्या मान्य केले.
जलसंपदा, जलसंधारण व पाणीपुरवठा क्षेत्रांमध्ये व्यक्ती अथवा संस्था स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. शुक्रवारी ९ जुलैला सरकारने अनुक्रमे ५, ३ व २ लाख रुपये रोख रकमेच्या या पुरस्कारांसाठी सिन्नर (जि. नाशिक) येथील युवामित्र संस्थेचे स्व. सुनील पोटे, अंबेजोगाई (जि. बीड) येथील मानवलोक संस्थेचे अनिकेत द्वारकादास लोहिया व नागपूर येथील प्रवीण महाजन या तिघांच्या नावाची घोषणा केली. यासाठी गेल्या वर्षी १२ जून २०२० ला प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी विजेत्यांची निवड व पुरस्कार वितरण होऊ शकले नव्हते. आता हे पुरस्कार मंगळवारी १३ जुलैला मुंबईत स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या पहिल्या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
या विजेत्यांपैकी सुनील पोटे यांनी सिन्नर तालुक्यातील देवनदी पुनरूज्जीवनासाठी केलेले कार्य तसेच त्या तालुक्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी केलेले काम महाराष्ट्राला माहीत आहे. दुर्दैवाने १३ सप्टेंबर २०२० रोजी तरुण कार्यकर्ते सुनील पोटे यांचे कोरोनाने निधन झाले. असेच मोठे काम बीड जिल्ह्यात व मराठवाड्याच्या अन्य भागात द्वारकादास लोहिया यांच्या मानवलोक संस्थेने केले आहे. नागपूरचे प्रवीण महाजन हेदेखील जलअभ्यासक म्हणून परिचित आहेत. तथापि, ते विदर्भ कंत्राटदार व बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. ऑगस्ट २०१५ मध्ये तीन वर्षासाठी त्यांची त्या पदावर निवड झाली होती. याशिवाय विदर्भ पाटबंधारे महामंडळात त्यांची चांगली उठबस आहे. अलीकडेच या कंत्राटदार संघटनेने प्रवीण महाजन यांच्याच पुढाकाराने नागपूरमध्ये काेविड सेंटर उघडले होते. कंत्राटदार संघटनेच्या माजी अध्यक्षांना राज्य शासनाचा मानाचा जलभूषण पुरस्कार दिला जात असल्याने जलसंपदा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रवीण महाजन यांच्या म्हणण्यानुसार, ते नोंदणीकृत कंत्राटदार नाहीत. असे असेल तर ते कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष कसे बनले, असा प्रश्न निर्माण होतो.
-------------
जलभूषण पुरस्कारासाठी गुण पद्धतीने निवड करण्यात आली. त्यासाठी अधिकाऱ्यांची एक समिती नेमण्यात आली होती. समितीने तर दुसऱ्या क्रमांकासाठीच प्रवीण महाजन यांचे नाव प्रस्तावित केले होते. कंत्राटदार व्यक्तीला पुरस्कार दिला तर टीका होईल, असे आपण स्वत:च समितीला सांगितले होते. तेव्हा त्यांना तिसरा क्रमांक देण्यात आला.
- जयंत पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य