नागपूर :मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्यांवर लाठीचार्ज होणे, हे दुर्दैवी आहे. गृहमंत्र्यांच्या आदेशाने मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जोरदार भाषण होत असताना लाठीचार्ज करण्याचे पाप केले, असा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, लहान मुलांवर लाठीचार्ज झाला, गृहमंत्री म्हणतात सौम्य लाठीचार्ज करायला सांगितले होते. आमिष देऊन मराठा समाजावार लाठीचार्ज केला. स्वतः सरकारने राजीनामे दिले पाहिजे, जनता माफ करणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती संपवण्याचा घाट सरकार घालत आहे, हा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असे पटोले म्हणाले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कॉंग्रेस भूमिका निभावेल, असे म्हणत पटोले यांनी राष्ट्रीय जनगणना करून घेण्याची मागणी केली.
पोलीस तुमचे, आदेश तुमचे, मग राजकरण कोण करत आहे? हे सरकारं स्वत: भ्रष्टाचार करून परिवारवाद करण्याचा आरोप कॉंग्रेसवर करत आहे. इंडिया आघाडीची बैठक असल्यान प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी हे केले. २४ तासांत आरक्षण आणून देण्याची फडणवीस बतावणी करत होते. या सर्व चोराच्या उलट्या बोंबा आहेत. नियमित अधिवेशन आताच संपले, पंतप्रधान यांच्याकडे मणिपूरवर बोलण्यासाठी वेळ नाही, आता अधिवेशन बोलवत आहेत. जुमलेबाज सरकार आहे, वेळेवर काहीही करतील, निवडणुका लावतील, लोकांनी यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
भारत भारत आहे. मूळ मुद्याला दुर्लक्ष करत असेल तर त्यावर चर्चाच करायची गरज नाही. पाकिस्तानचे लोक हिंदुस्तान म्हणतात. सरसंघचालक मोहन भागवत हे देखील हिंदुस्थान म्हणत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
रविवारपासून जनसंवाद पदयात्रा
- जनसंवाद पदयात्रेची सुरुवात रविवारी आष्टी शहिद येथून होत आहे. राज्यातील विविध स्थळी ही यात्रा सुरू करत आहे. जुमलेबाज सरकार आहे, तरुणांना फसवलं, सर्वसामान्य लोकांचं जगन मुश्किल केले, या जनसंवाद यात्रेतून या सरकारची पोलखोल करणार आहोत. ३ ते १२ सप्टेंबर ही यात्रा आहे, नवरात्र नंतर दुसरी यात्रा होईल, असेही पटोले यांनी सांगितले
ईव्हीएम ऐवजी बॅलेटने मतदान घ्या
- वन नेशन वन इलेक्शन घेण्यास हरकत नाही. पण निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात. ईव्हीएम ऐवजी बॅलेटने मतदान घ्यावे, मग ती ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत निवडणुका घेतल्या तरी चालेल. आमची हरकत नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.