काेंढाळी : महामार्ग पाेलीस दलाच्यावतीने खुर्सापार येथे कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ३२ व्या महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय महामार्ग पाेलीस दलाचे उपअधीक्षक संजय पांडे, लाखाेटिया भुतडा महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश शेंबेकर, पाेलीस निरीक्षक वैशाली वैरागडे, काेंढाळीचे ठाणेदार विश्वास पुल्लरवार, गाेपाल माकाेडे, टाेल प्लाझाचे व्यवस्थापक रवींद्र वैद्य उपस्थित हाेते. हे अभियान १७ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान राबविले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग पाेलीस दलाच्या खुर्सापार मदत केंद्रातील पाेलीस उपनिरीक्षक अनिल राऊत यांनी प्रास्ताविकातून या अभियानाबाबत माहिती दिली. त्यांनी या मदत केंद्राच्या माध्यमातून केले जात असलेल्या कार्याचा आढावा घेतला. अतिथींनी रस्ते अपघात टाकळण्यासाठी करावयाच्या उपाययाेजना व घ्यावयाची काळजी याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. देशात काेराेनामुळे १ लाख ५० हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून, रस्ते अपघातात देशभरात दरवर्षी १ लाख ६० हजार लाेकांना मृत्यू हाेत असल्याची माहिती पाेलीस उपअधीक्षक संजय पांडे यांनी दिली. त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकाेर पालन करण्याचे तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी वृत्तपत्र प्रतिनिधी व पाेलीस कर्मचाऱ्यांचा गाैरव करण्यात आला. संचालन सुभाष ढबाले यांनी केले तर विनायक देवकर यांनी आभार मानले.