लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत नागपूर येथे वन व अन्य विभागाच्या सहकार्याने ५६ स्थानावर एकाच दिवशी तीन लक्ष रोपट्याचे रोपण करून वृक्षलागवड मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोरेवाडा रोपवाटिका येथे वनऔषधी गुणधर्म असलेले ‘बेहडा’ जातीचे रोपटे लावून जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ केला.नवीन काटोल नाका मानकापूर बायपास रिंगरोड गोरेवाडा रोपवाटिका येथे आज वनमहोत्सवांतर्गत महाराष्ट्र वनविकास महामंडळ व वन विभागाच्यावतीने वृक्षलागवड अभियानाचे उद् घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे अध्यक्षस्थानी होते.आ. सुधाकर देशमुख, नगरसेविका संगीता गिरे, अर्चना पाठक, भूषण शिंगणे, जगदीश ग्वालवंशी, हरीश ग्वालवंशी, उत्पादन व व्यवस्थापन विभाग प्रधान मुख्य वन संरक्षक शेषराव पाटील, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक रामजी यादव, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू, मुख्य वन संरक्षक संजीव गौड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे, उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, वनसंरक्षक गिºहेपुंजे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, की येणाऱ्या काळात महाजनकोच्या मदतीने महिला बचत गटांना १० एकर जमिनीवर ४ हजार रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. याशिवाय २० सदस्यीय महिला बचत गटाच्या प्रत्येक महिलेला या उपक्रमाद्वारे प्रत्येकी ५ हजार रुपये प्रति महिना उत्पन्न मिळेल असा प्रयत्न देखील केला जाणार आहे.या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात कोराडी परिसरातील २०० महिलांना जमीन वाटपाने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बेल, मोहा, आंबा व त्रिफळा वनाची निर्मितीवनमहोत्सवांतर्गत रविवारी आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेहडाचे रोपण केले. याशिवाय आमदार सुधाकर देशमुख यांनी बेल तसेच वन अधिकारी शेषराव पाटील यांनी आंब्याचे रोपटे लावले. गोरेवाडा रोपवाटिका परिसरात यावर्षी बेलवन, मोहा वन, गावठी आंबा वन तसेच त्रिफळा वनाची निर्मिती करण्यात आली आहे. या चारही वनात ४०० हून अधिक रोपटे लावण्यात येणार आहे.