७५ ऑक्सिजन झोन अभियान : महापौरांची संकल्पना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त नागपूर शहरात ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्याची संकल्पना महापौर दयाशंकर तिवारी यांनी मांडली आहे. या अनुषंगाने पूर्व नागपूर आणि दक्षिण नागपूर भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून ऑक्सिजन झोन तयार करण्याच्या अभियानाला गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. प्रभाग ३० मधील उमरेड रोड येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर एका लहान मुलीच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, आमदार कृष्णा खोपडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त विकास कुमार, माजी स्थायी समिती सभापती विजय झलके आदी उपस्थित होते.
वृक्षारोपण अभियानात कडूनिंब, करंजी, पिंपळ, वड व कदम यासारखे प्राणवायू देणारे १००० वृक्ष लावण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत सर्व ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्यात येईल. याची सुरुवात पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गांधीबाग उद्यानातून झाली. तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. दुसरा टप्पा म्हणून भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर एक हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. प्रभाग २६, प्रभाग २४ आणि प्रभाग २८ येथेसुद्धा वृक्षारोपणाची सुरुवात झाली.