लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाडी-खडगाव मार्गावरील लाव्हा येथे रंगपंचमीनिमित्त सोनबा बाबा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ‘होक रे होक’ गर्जनेने संपूर्ण परिसर निनादला होता. लाव्हा येथील सोनबा बाबा उत्सवात परंपरेनुसार बैलाविना बंड्या धावल्या. सोनबा बाबा उत्सव समितीच्यावतीने २०४ वर्षांपासून या उत्सवाचे रंगपंचमीच्या दिवशी आयोजन केले जाते. लाव्हा येथे सोनबा बाबा यांचे प्राचीन मंदिर असून, तिथे होळीच्या पाडव्याला अर्थात धुळवडीला घटस्थापना करण्यात आली.स्थानिक गोरले कुटुंबीयांच्यावतीने हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. महादेवराव गोरले (८३) यांनीही ही परंपरा कायम ठेवली आहे. महादेवराव गोरले होळीपासून उपवास करतात. सध्या या कुटुंबातील सातवी पिढी कार्यरत आहे. रंगपंचमीच्या दिवशी ग्रामस्थ या उत्सवाची तयारी करतात. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी रात्री १२ वाजता लाव्हा व सोनबानगर यांच्या सीमेवर असलेल्या सोनबा बाबा यांच्या मंदिरात विधिवत पूजा व महाआरती केली जाते.रंगपंचमीच्या दिवशी बैलगाड्या एकाला एक बांधल्या जातात. या बैलगाड्या बैलांविना चालविण्याची परंपरा आजही कायम आहे.यावर्षी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ‘होक रे होक’ ही गर्जना करून महादेवराव गोरले यांनी बंड्या चालवायला सुरुवात केली. या बैलाविना बैलगाड्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले होते. या बैलगाड्या बैलाविना धावत नसून, येथील भाविकांच्या ऊर्जेने त्या पुढे ढकलल्या जातात. हा चमत्कार नाही. अनेक वर्षांपासून ही परंपरा कायम असून, याची कारणमीमांसा करण्यात आली नाही, असेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्पष्ट केले.या उत्सवानिमित्त गावात यात्रा भरली होती. त्यात विविध दुकाने थाटली असून, मुलांसाठी पाळणे व इतर मनोरंजनाची साधने लावण्यात आली होती; शिवाय खडातमाशा, कव्वाली, गमतीसह अन्य मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. महाप्रसादाने या उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी अंदाजे २० हजार भाविकांनी हजेरी लावली होती.
नागपूरनजीकच्या लाव्ह्यात बैलाविना धावल्या बंड्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 10:49 PM
वाडी-खडगाव मार्गावरील लाव्हा येथे रंगपंचमीनिमित्त सोनबा बाबा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ‘होक रे होक’ गर्जनेने संपूर्ण परिसर निनादला होता. लाव्हा येथील सोनबा बाबा उत्सवात परंपरेनुसार बैलाविना बंड्या धावल्या.
ठळक मुद्देसर्वत्र निनादला ‘होक रे होक’