विनयभंग, फसवणूकही केली : गुन्हा दाखलनागपूर : महिला पक्षकाराला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अखेर अंबाझरी पोलिसांनी आरोपी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. भय्यासाहेब भिडे (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. तो रामनगर तेलंखेडी येथे राहातो. पीडित महिला (वय २८) एका खासगी कंपनीत काम करायची. कंपनीने पगार थकीत ठेवल्यामुळे तिने नोकरी सोडली. त्यानंतर थकीत पगाराची वसुली करण्यासाठी महिलेने कोर्टात प्रकरण नेण्याची तयारी केली. त्यासाठी आरोपी भिडेची वकील म्हणून नियुक्ती केली. प्रदीर्घ कालावधी होऊनही कोर्टाच्या प्रकरणाचे काय झाले, त्याबाबत भिडेकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने महिलेने भिडे यांच्याकडे तगादा लावला. भिडेने त्या महिलेला कोर्टाचा निकाल विरोधात लागल्याचे सांगून तिला आदेशपत्र आणून दिले. त्या कागदपत्रांची चौकशी केली असता ते बनावट असल्याचे उघड झाले. भिडेने वकील फी म्हणून ५० हजार रुपये घेऊनही कोर्टात केसच दाखल केली नसल्याचे उघड झाल्यामुळे पीडित महिलेने १ आॅक्टोबरला भिडेकडे जाब विचारला. यावेळी भिडेने अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली.पोलिसांकडून टाळाटाळया प्रकाराची तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या महिलेला अंबाझरी पोलिसांनी एनसीची (अदखलपात्र) पावती देऊन तिला परत पाठविले. पोलीस आरोपी वकिलावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पाहून शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे धाव घेतली. वरिष्ठांनी अंबाझरी पोलिसांची खरडपट्टी काढल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, कोणत्याही तक्रारकर्त्यांना पोलीस ठाण्यातून टोलवले जाणार नाही, असे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव वारंवार सांगत असले तरी अंबाझरीसह काही पोलीस ठाणी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे उघड झाले आहे.
वकिलाकडून महिला पक्षकाराला मारहाण
By admin | Published: October 31, 2015 3:22 AM