लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - आजारपण आणि आर्थिक टंचाईने ग्रासलेल्या वकिलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना प्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या इंद्रप्रस्थनगरात घडली. श्रीकांत वामनराव मारसकर (४५) असे या मृत वकिलाचे नाव आहे. या वकिलाच्या कुटुंबात स्मिता आणि सुजाता या दोन अविवाहित बहिणी असून, त्यापैकी एक डॉक्टर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसापासून मारसकर अस्वस्थ होते. मंगळवारी सकाळी स्मिता बाहेर गेली असता श्रीकांत मारसकर आणि सुजाता घरी होत्या. मारसकर आपल्या बेडरूममध्ये आराम करीत होते. यादरम्यान त्यांनी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान सिलिंग फॅनला दोर बांधून गळफास घेतला. दुपारी १.३० वाजता सुजाताने त्यांना जेवण करण्याकरिता आवाज दिला. दार आतून बंद होते. प्रतिसाद न मिळाल्याने मोबाईलवर कॉल केला, तरीही प्रतिसाद मिळत नसल्याने तिने स्मितासोबत संपर्क केला. घरी पोहचल्यावर खिडकीमधून पाहिले असता ते फासावर लटकलेले दिले. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईकांच्या मदतीने दार तोडून त्यांना फासावरून उतरविले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली. त्यात आपणास मधुमेह, ब्लडप्रेशर, हृदयाचा आजार तसेच डोक्यावर बरेच कर्ज झाल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. मारसकर साधे आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या आत्महत्येमुळे वकीलवर्गात हळहळ व्यक्त होत आहे. आठ महिन्यापासून ते आजारपणासोबत आर्थिक अडचणीचा सामना करीत होते. मात्र कुणीही लक्ष दिले नाही. दरमहा द्यावा लागणारा हप्ता आणि कौटुंबिक जबाबदारीमुळे ते चिंतित होते.