नागपूर : पक्षकार न्याय मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतात. वकील हा न्यायदान व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांनी नेहमी प्रामाणिकपणे कार्य करावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी केले.
हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत न्या. देव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तरुण वकिलांचे भविष्य व त्यांची न्यायालयातील वागणूक, हा व्याख्यानाचा विषय होता. वकिली हा धंदा नाही. ही एक महान सेवा आहे. नागपूरला प्रतिष्ठेची वकिली परंपरा लाभली आहे. नवोदित वकिलांनी ही प्रतिष्ठा जपावी, असेही त्यांनी सांगितले. स्टडी सर्कल समन्वयक ॲड. फिरदौस मिर्झा यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे, सचिव ॲड. अमोल जलतारे व इतर पदाधिकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.