नागपूर : ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी नागपुरात पार पडली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या मतमोजणीनंतर निवडणूक अधिकारी अॅड. मकरंद अग्निहोत्री यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला. या निवडणुकीत ज्येष्ठ कांदबरीकार, कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी सर्वाधिक ४२७ मते घेत बाजी मारली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र शोभणे यांना ३५७ मते मिळाली. शोभणे यांचा ७० मतांनी पराभव झाला. राजन खान तिसºया क्रमांकावर राहिले. त्यांना 123 मते मिळाली. डॉ. किशोर सानप यांना 47 तर रवींद्र गुर्जर केवळ ४१ मतांवर समाधान मानावे लागले. यंदाच्या पंचरंगी लढतीत कोण बाजी मारतो याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागले होते. सुरुवातीला पंचरंगी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात देशमुख विरुद्ध शोभणे अशा थेट दुहेरी लढतीवर येऊन थांबली होती. विजयासाठी ४३५ मतांचा कोटा पूर्ण करायचा होता. परंतु मतमोजणीच्या चार फेºयांनंतरही हा कोटा कोणत्याच उमेदवाराला पूर्ण करता आला नाही. त्यामुळे सर्वाधिक ४२७ मते मिळविणाºया लक्ष्मीकांत देशमुख यांना विजयी घोषित करण्यात आले. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही डॉ. रवींद्र शोभणे विजय खेचून आणू शकले नाहीत. राजन खान यांचे वाड्:मयीन योगदान मोठे असूनही त्यांना कसाबसा तिहेरी आकडा गाठता आला. डॉ. किशोर सानप आणि रवींद्र गुर्जर यांचे तर या निवडणुकीत पार पाणीपत झाले. या निवडणुकीचे निर्वाचन अधिकारी म्हणून अॅड. मकरंद अग्निहोत्री तर उपनिर्वाचन अधिकारी म्हणून अॅड. मोहन पारखी यांनी काम पाहिले. त्यांना प्रदीप मोहिते, वैजयंती पोद्दार,नभा टेंभूरकर, रमेश उके आणि मोहन मसराम यांनी सहकार्य केले.
असा लागला निकाल-
एकूण मतदार - १,०७३
एकूण मतदान - ८९६
वैध मते - ८६८
अवैध मते - २८
एकूण फे-या - ४
अंतिम निकाल-
लक्ष्मीकांत देशमुख - ४२७
डॉ. रवींद्र शोभणे - ३५७
राजन खान - 123
डॉ. किशोर सानप - 47
गुर्जर केवळ - ४१