एकनाथ निमगडे खून प्रकरणातील तीन संशयितांची लायडिटेक्टर चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 09:52 PM2021-06-15T21:52:56+5:302021-06-15T21:53:32+5:30
Eknath Nimgade murder case, Lay detector test बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे खून प्रकरणातील सत्य शोधून काढण्यासाठी सीबीआयने तीन संशयित आरोपींची लायडिटेक्टर चाचणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे खून प्रकरणातील सत्य शोधून काढण्यासाठी सीबीआयने तीन संशयित आरोपींची लायडिटेक्टर चाचणी केली आहे. तसेच, उर्वरितांपैकी चार संशयित आरोपी वगळता इतरांची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली आहे. प्रकरणाचे तपास अधिकारी जितेंद्र कचारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाला प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली.
या प्रतिज्ञापत्रानुसार, लायडिटेक्टर चाचणी झालेल्या आरोपींमध्ये इम्रान ऊर्फ कालू अब्दुल करीम अन्सारी, नाजीम ऊर्फ नासीर खान व नवाब ऊर्फ नब्बू छोटेसहाब अशरफी यांचा समावेश आहे. एप्रिल-२०२१ मध्ये प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने या तिघांसह मो. शाहबाज मो. अरशद या आरोपीचीही पॉलिग्राफ चाचणी करण्याची परवानगी दिली होती. दरम्यान, मो. शाहबाजच्या वडिलांचा मृत्यू झाला. तसेच, त्याची मानसिक अवस्था चांगली नाही. त्यामुळे त्याची पॉलिग्राफ चाचणी होऊ शकली नाही. इतर संशयित आरोपींमध्ये अफसर खान साहेब खान, फिरोज ऊर्फ बडे भाई छोटे सहाब अशरफी, मुश्ताक ऊर्फ मुशो अशरफी प्यारेसहाब अशरफी, शेख अलताफ शेख हबीब, अब्दुल हक अब्दुल रफिक, मोहसीन अन्सारी ऊर्फ राजा ऊर्फ पीओपी बद्रुद्दीन अन्सारी, रणजित सफेलकर, शरद ऊर्फ कालू नारायण हाटे व भारत नारायण हाटे यांचा समावेश आहे. यापैकी कोरोना झालेल्या अफसर खान, मुस्ताक अशरफी, शेख अलताफ व अब्दुल हक यांना वगळता इतर आरोपींची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली आहे.
सुरुवातीला पायोनियर ग्रुपचे मकसुदल सिद्धिक व अनिल नायर आणि ग्रीन लेवेरेज ग्रुपचे उमेश गुप्ता यांच्यावर संशय घेण्यात आला होता. त्यामुळे नायर व गुप्ता यांचे बयान नोंदवण्यात आले, पण त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे मिळून आले नाही. सिद्धिक यांचे आजापणामुळे २ सप्टेंबर २०१८ रोजी निधन झाले. त्यामुळे त्यांचे बयान नाेंदवता आले नाही. परंतु, त्यांची मुले जुल्फकारुल व झहीरुल यांच्यासह कर्मचारी व वाहन चालकाची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडूनही ठोस पुरावे मिळाले नाही. आतापर्यंत एकूण ७६ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. याशिवाय ४२ मोबाईल क्रमांकाचा सीडीआर रेकॉर्ड काढण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज पुणेतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. मोबाईल फोन डम्प डाटावरून आराेपींची घटनास्थळावरील उपस्थितीही तपासली जात आहे.
अनुपम निमगडे प्रत्युत्तर देणार
आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांचा मुलगा ॲड. अनुपम निमगडे यांनी या प्रकरणाचा वेगात तपास व्हावा याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात सीबीआयने सदर प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाला तपासाची विस्तृत माहिती दिली. त्यानंतर अनुपम निमगडे यांनी या प्रतिज्ञापत्रावर प्रत्युत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाला दोन आठवडे अवधी मागून घेतला. परिणामी, या याचिकेवर दाेन आठवड्यानंतर पुढील सुनावणी होईल.
बंद केलेला तपास सुरू केला
ठोस पुरावे मिळून आले नाही म्हणून, सीबीआयने या प्रकरणाचा तपास बंद केला होता. त्यासंदर्भात २२ डिसेंबर २०२० रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात अहवालही सादर करण्यात आला होता. त्यानंतर नागपूर पोलीस आयुक्तांनी १७ मार्च २०२१ रोजी सीबीआयला पत्र पाठवून नवीन संशयित आरोपींची माहिती दिली. त्यामुळे सीबीआयने ३० मार्च २०२१ रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज सादर करून प्रकरणाचा तपास नव्याने सुरू करण्याची परवानगी मागितली. तो अर्ज मंजूर झाल्यामुळे सीबीआयने परत तपास सुरू केला आहे.