नागपूर : उपराजधानी नागपुरात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या जोरावर आहे. बुधवारी शहरातील मानेवाडा चौकात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारची ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्याची इच्छा नाही, त्यामुळे आता भाषण देऊन उपयोग नाही असे म्हणत राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा खोचक इशारा यावेळी बावनकुळे यांनी दिला. (Chandrashekhar Bawankule)
राज्य सरकारने ओबीसींना राजकीय आरक्षणाचा फायदा मिळावा, यासाठी बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या मुद्द्यावरून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारमधील नेत्यांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात शहराध्यक्ष प्रवीण दडके यांच्यासह अनेक आमदार, कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनामुळे शहरातील वर्दळीच्या मानेवाडा चौकातील वाहतूक जवळपास अर्धा तास खोळंबली होती. या आंदोलनाची पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले. हे आंदोलन संपुष्टात आले असले तरी यापुढे शहराच्या मोठ्या भागात आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.