आॅनलाईन लोकमतनागपूर : वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल अंतर्गत सोमवारी सकाळी आघाडीचे तरुण गायक राहुल देशपांडे यांची शास्त्रीय रागाची मैफिल आयोजित करण्यात आली होती. या मैफिलीत त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना रिझवले. हा कार्यक्रम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात पार पडला.कार्यक्रमात लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, सेवानिवृत्त विंग कमांडर रमेश बोरा आदी मान्यवर उपस्थित होते. सृजनाच्या चरम सीमेला पोहोचलेले डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या अविनाशी व अमिट संगीताचे वारसदार असणारे राहुल यांनी स्वप्रतिभा, कठोर परिश्रम व गुरु डॉ. वसंतराव व पंडित कुमार गंधर्व यांच्या वैशिष्टपूर्ण संस्कारांसह आपले गायन विश्व उभे केले आहे. त्यांच्या गायनाचा एक खास वर्ग सर्वदूर पसरला आहे. आजच्या मैफिलीत त्यांनी जाणत्या व नेणत्या श्रोत्यांशी संवाद साधत गायन सादर केले.त्यांनी प्रसन्न अनुभुतीच्या राग रामकलीसह गायनाला सुरुवात केली. भैरव रागाचे ललित रुप म्हणजे हा रामकली आहे. मृदु व भावनाशील स्वरसमूह, नखरेल लय व नर्मश्रृंगारिक अर्थभावाच्या बंदिशींसह राहुल यांनी सुरुवातीलाच श्रोत्यांना जिंकून घेतले. विलंबित लयीतील ‘ये करम गती, बहुत दिन बिते पिया घर नाही आये...’ व मध्य लयीतील ‘मै को जा-जा जगा पियरवा सोने ना दे...’ या बंदिशींसह हे गायन अविष्कृत होत गेले. जन्मत:च सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या या गायकाने शास्त्र सुरांची अदब राखून सौंदर्यात्मक स्वरुपात हे सादरीकरण केले.यानंतर सालगबराडी या रागातील ‘सुमर साहेब सुलतान’ ही प्रसन्न बंदिश सादर झाली. अतिशय रसिल्या अशा राग अहीरभैरवमधील ‘अलबेला सजन आयो री...’ ही बंदिश गायकाने तेवढ्याच रसिल्या अंदाजात सादर केली. सुरेल स्वर, उत्तम दमसास, लयकारीचे लाजबाब विभ्रम, प्रभावी गमक व मिंड अंग अशा वैशिष्ट्यांचे हे जेवढे बुद्धिप्रधान तेवढेच भावप्रधान असे हे एकूण सादरीकरण श्रोत्यांची उत्फूर्त दाद मिळवून गेले. शेवटी राग देशकारमधील ‘आयो मिलन को जी...’ ही बंदिश सादर करून राहुल यांनी गायनाचे समापन केले. त्यांना सचिन बक्षी (तबला) व श्रीकांत पिसे (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. रितेश तालेवार व चिराग बोखार सहतानपुरा कलावंत होते. शुभांगी रायलू यांनी निवेदन केले.