- वेदप्रकाश मिश्रा : सत्यनारायण नुवाल, चंद्रकांत चन्ने यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या अवतीभवती अनेक प्रेरणास्रोत आहेत. मात्र, या प्रेरणास्रोतांचे अनुकरण करण्याची वृत्ती अंगी बाळगली पाहिजे, अशी भावना कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत चन्ने यांना २०२० सालचा तर प्रसिद्ध उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांना २०२१ सालचा जीवनसाधना पुरस्कार देऊन गौरव केला. त्या निमित्ताने त्यांचा सत्कार सोहळा वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते विदर्भ गौरव प्रतिष्ठान, श्रमिक पत्रकार संघ, प्रेस क्लब व सर्व पत्रकार परिवाराच्या वतीने बुधवारी शंकरनगर येथील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी होते तर व्यासपीठावर अतुल कोटेचा, प्रदीप मैत्र, दिलीप जाधव, सुरेश राठी, शुभदा फडणवीस उपस्थित होते.
मुलांशी संवाद साधल्यास मुलांच्या संवेदना आपणास कळतात आणि त्या संवेदना जपल्या नाही तर अतिशय वाईट परिस्थितीचा सामना करावा लागेल, असा सूचक संदेश सत्कारमूर्ती चंद्रकांत चन्ने यावेळी सत्काराला उत्तर देताना दिला. सत्यनारायण नुवाल यांनीही सत्काराला उत्तर देताना भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचालन अनिल गडेकर यांनी तर प्रास्ताविक राजेश पाणूरकर यांनी केले. आभार राम भाकरे यांनी मानले.
................