गिरीश व्यास : मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा वर्धापनदिन उत्साहातनागपूर : शहरात नाटकाचा पे्रक्षक वर्ग मोठा आहे. परंतु यातल्या अनेकांना नाटकाच्या मोफत पासेस हव्या असतात. तिकीट काढून नाटक पाहण्याची त्यांची मानसिकता दिसत नाही. अशाने नाट्यचळवळ कशी समृद्ध होणार? नाटक जगावे, ते टिकावे, असे खरेच वाटत असेल तर मोफत पासेचचा मोह टाळा आणि तिकीट काढून नाटक पाहायला शिका, असे आवाहन विधान परिषदेचे सदस्य गिरीश व्यास यांनी केले. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रभाषा संकुलातील श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर शेखर सावरबांधे, ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद भुसारी, नरेश गडेकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल फरकसे आणि श्रद्धा तेलंग उपस्थित होत्या. अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. गिरीश गांधी म्हणाले, शहरात नाटकाला राजाश्रय मिळाला नाही. पश्चिम महाराष्ट्राचे आमदार या सांस्कृतिक ठेव्याकडे जितक्या गंभीरतेने बघतात तितक्या गंभीरतेने विदर्भातील आमदार बघत नाहीत. झाडीपट्टीत दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल होते. मुंबई-पुण्याकडचे कलावंत तिथे येतात व खोऱ्याने पैसा ओढून निघून जातात. स्थानिक कलावंत मात्र उपेक्षितच राहतात. हे चित्र बदलण्यासाठी रंगकर्मी व राजकारणी दोघांनाही पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मराठी रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या कलावंतांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या क्रमात सर्वात आधी ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार, शोभा बोेंद्रे यांना ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार तर अॅड. अजय घोरे यांना श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार प्रवीण खापरे, झाडीपट्टी ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार कमला आगलावे, झाडीपट्टी श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार हिरालाल पेंटर तर रंगसेवा पुरस्कार अनिल इंदाणे यांना देण्यात आला. पुरस्कार वितरणाच्या दुसऱ्या टप्प्यात उत्कृष्ट दिग्दर्शक (सर्जिकल स्ट्राईक)- देवेंद्र बेलणकर, उत्कृष्ट अभिनेत्री (सर्जिकल स्ट्राईक)- रूपाली कोंडेवार-मोरे, उत्कृष्ट अभिनेता (अशी ही चांद रात आहे) - राहुल फडणवीस, उत्कृष्ट प्रकाश योजना (टॉवर) - बाबा पदम, उत्कृष्ट नेपथ्य (अशी ही चांद रात आहे)- सुनील हमदापुरे, नाना मिसाळ, उत्कृष्ट संगीत (कौमार्य)- हेमंत तिडके. विलास कुबडे - (निर्मिती-तृतीय-टॉवर), नितीन पात्रीकर (दिग्दर्शक/तृतीय, अभिनय उत्तेजनार्थ-टॉवर), हेमंत मुढानकर (अभिनय उत्तेजनार्थ-टॉवर), भावना चौधरी (अभिनय-तृतीय- टॉवर), पूजा पिंपळकर (अभिनय उत्तेजनार्थ-कौमार्य), संजय काशीकर (नेपथ्य-द्वितीय-टॉवर), प्रियंका ठाकूर (अभिनय/दिग्दर्शन-झलकारी), लालजी श्रीवास (रंगभूषा-तृतीय-झलकारी). यासोबतच वैदर्भीय रंगभूमीसाठी विशेष योगदान देणाऱ्या संस्थांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये संजय भाकरे फाऊंडेशन, स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ, हेमेन्दू रंगभूमी, राष्ट्रभाषा परिवार व अद्वैत नाट्यसंस्थांना पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्रफुल फरकसे यांनी तर आभार श्रद्धा तेलंग यांनी मानले. (प्रतिनिधी)
तिकीट काढून नाटक पाहायला शिका
By admin | Published: April 16, 2017 2:03 AM