लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुलेच महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात. परंतु ही सर्वच मुले शिक्षणात मागे पडतात, हा सर्वसामान्यांचा समज मनपाने खोडून काढला आहे. विद्यार्थ्यांसाठी जे विशेष कोचिंग पॅटर्न राबविले त्याचे फलित या विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून दर्शविले आहे. आपल्या ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याचे शिक्षण हेच सर्वात मोठे माध्यम आहे, असा मंत्र केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.दहावी परीक्षेत मनपाच्या शाळांनी घवघवीत यश प्राप्त केले. मनपाच्या २९ शाळांमधील १३ गुणवंतांचा शनिवारी गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानी गौरव करण्यात आला. उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, नियंत्रण अधिकारी नितीन भोळे उपस्थित होते.नितीन गडकरी म्हणाले, महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. या गरीब घरच्या विद्यार्थ्यांना प्राविण्य श्रेणीत आणण्याचे काम शिक्षण समिती आणि विभागाने केले आहे. आजपर्यंत शहरातील मोठ्या खासगी शाळातील विद्यार्थ्यांचेच नाव प्राविण्य श्रेणीत दिसायचे. मात्र मनपाच्या विद्यार्थ्यांनी आपली क्षमता सिद्ध करून आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. मुस्लिम समाजाला शिक्षणाची गरज आहे. समाजातील मुलामुलींनी तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाचे समन्वयन शिक्षण विभागाचे विनय बगले आणि संचालन प्रभारी सहा.शिक्षणाधिकारी सुभाष उपासे यांनी केले.सभापती व अधिकाऱ्यांचा सत्कारशिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने आणि शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष कोचिंग देणाºया शहरातील विविध तज्ज्ञ शिक्षकांनाही त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले.
ज्ञानातून संपत्तीप्राप्तीचे शिक्षण हेच मोठे माध्यम : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 10:32 PM