लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभिनेता आमिर खानच्या ‘तारे जमी पर’ चित्रपटातील ईशान या मुलाप्रमाणे अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसॅबिलिटी) असलेल्या मुलांच्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी राज्य शासनाकडून आली आहे. अशा मुलांच्या थांबलेल्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) मध्ये अध्ययन अक्षमता समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील वैद्यकीय विद्यापीठाचे १६ डीएमआरई आणि जिल्हा रुग्णालयांतर्गत ३० ठिकाणी असे केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.सोशालिस्टिक आॅपरेशन फॉर अकॅडेमिकली हॅण्डीकॅप अॅण्ड मेन्टोरशीप (सोहम) संस्थेचे अध्यक्ष संजय अवचट यांनी बुधवारी ही माहिती दिली. दिव्यांगाच्या शैक्षणिक अध्ययन अक्षमतेबाबत उपचारासाठी राज्यात केवळ पुणे आणि मुंबई येथे केंद्र आहेत. विदर्भासह मराठवाडा, कोकण विभागात उपचार आणि प्रशिक्षणासाठी सुविधा नसल्याने अशा मुलांच्या पालकांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. त्यासाठी सोहम या स्वयंसेवी संस्थेने मागील १२ वर्षांपासून लढा चालविला आहे. याबाबत संस्थेने जनहित याचिका दाखल केली होती. जून २०१६ मध्ये नागपूर खंडपीठानेही संस्थेच्या बाजूने निकाल दिला़ मात्र शासनाकडून कोणतीही पावले उचलली नाही. दरम्यान पावसाळी अधिवेशनात आमदार अनिल बोंडे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत यासाठी प्रयत्न चालविले. यानंतर ३० जुलै रोजी सचिव स्तराची बैठक घेऊन असे केंद्र स्थापनेबाबत निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत मुंबईचे डॉ. व्ही.एम. काळे व सोहमचे अध्यक्ष अनिल अवचट यांच्या नेतृत्वात सात सदस्यांची समिती गठित करून राज्यभरात सर्वेक्षण सोपविण्यात आले. नागपूरबाबत सात दिवसात अहवाल सादर करून हे केंद्र सुरू करू , असा विश्वास अवचट यांनी दिला.नागपुरात दरवर्षी दीड ते दोन हजार अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना शिक्षण सोडावे लागते. राज्यात हा आकडा ५० हजाराच्या जवळपास आहे. ही मुले सामान्य मुलांसारखीच असतात, मात्र त्यांच्यात लिहण्यावाचण्यात व गणित समजण्यात गतिमंदता असल्याने पालकांना मनस्ताप होतो व मुलांचे नुकसान होते. त्यांच्यासाठी समुपदेशन हाच एक उपाय आहे. योग्य समुपदेशन मिळाले तर काही दिवसात ही अक्षम मुले सामान्य मुलांपेक्षा अधिक बुद्धिमत्तेने काम करू शकतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. चंद्रकांत रागीट, मधुमिता क्षीरसागर, विजय खंते, प्रसन्न धनकर यांनीही माहिती दिली.
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लर्निंग डिसॅबिलिटी समुपदेशन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 11:45 AM
अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसॅबिलिटी) असलेल्या मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) मध्ये अध्ययन अक्षमता समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देसंजय अवचट यांची माहितीराज्यात ४६ केंद्रांचाही समावेश