नागपूर : आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी करण्यासाठी व दलालांना फाटा देण्यासाठी घरी बसून शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) देण्याची सोय सुरू झाली. मात्र, किचकट प्रणाली व अनेकदा शुल्क भरूनही प्रक्रिया पुढे जात नसल्याने ‘लर्निंग लायसन्स ऑफलाइनच बरे’ म्हणण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. परिणामी, आरटीओ कार्यालयातील गर्दी कायम आहे. यामुळे शहर, ग्रामीण व पूर्व आरटीओ कार्यालयात जवळपास रोज ३०० वर लायसन्स होत आहेत.
परिवहन विभागाने आधार क्रमांकाचा वापर करून घरबसल्या ‘लर्निंग लायसन्स’ काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु संबंधित संकेतस्थळावर विचारलेली माहिती भरून पुढे जाण्याची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने विशेष म्हणजे ऑनलाइन शुल्क भरूनही परीक्षेचे ऑपशन येत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. सध्या सर्वच आरटीओ कार्यालयात याबाबत अनेक उमेदवार तक्रारी घेऊन येत असल्याने अधिकारी अडचणीत आले आहेत. याच कारणाने आरटीओ कार्यालयातील अपेक्षापेक्षा गर्दी कमी झालेली नसल्याचे दिसून येत आहे.
- ऑनलाइनसाठी अडचणी काय?
लर्निंग लायसन्स ऑनलाइन काढण्याची पद्धत सोपी नाही. बारीकसारीक माहिती भरताना व प्रत्येक वेळी ‘नेक्स्ट’ बटन दाबल्यानंतरही काहीतरी राहून गेले असे मॅसेज येत असल्याने उमेदवार अडचणीत येत आहेत. महत्त्वाचे अनेकांना विचारलेले प्रश्नच समजत नाहीत. यातच ऑनलाइन शुल्क भरूनही पैसे जमा होत नसल्याच्याही काहींच्या तक्रार आहेत.
-उमेदवार वेगळा, ऑनलाइन परीक्षा देणारा दुसराच
ऑनलाइन परीक्षेत प्रत्येक प्रश्नाला केवळ ३० सेकंदाची मर्यादा आहे. या वेळेत उत्तर दिले नाही तर लगेच पुढचा प्रश्न येतो. गडबडीत उत्तर चुकून नापास होण्याचा धोका असल्याने व पुन्हा ५० रुपये फी भरण्याची वेळ येत असल्याने हे टाळण्यासाठी परीक्षार्थीं ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी दुसऱ्याची सर्रास मदत घेत असल्याचे दिसून येत आहे.
-ऑनलाइन लर्निंग लायसन्स किचकट
४० वर्षांवरील उमेदवारांना वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागत असल्याने तो अर्ज घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात आलो. परंतु येथे ऑनलाइन लर्निंग लायसन्सची प्रक्रिया किचकट असल्याचे कळल्याने ऑफलाइन लर्निंग लायसन्ससाठी प्रयत्न करणार आहे.
-अजय चहांदे, परीक्षार्थी
कोट...
लर्निंग लायसन्सची चाचणी देण्यासाठी ‘ऑनलाइन’ व ‘ऑफलाइन’ अशी दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. वाहनधारकांनी त्यांना जी सुविधा हवी आहे, ती निवडण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. ऑनलाइनमध्ये कोणतीही समस्या नाही.
-विनोद जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
वर्षनिहाय लर्निंग लायसन्स (आरटीओ, नागपूर ग्रामीण)
२०१८ : १४,५०२
२०१९ : १४,५०५
२०२० : २३,७२५
एप्रिल २०२१ : १००५