लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरटीओतील लर्निंग लायसन्स घोटाळ्यात आरोपी असलेल्या एका महिला आरटीओ अधिकाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सकाळी अटक केली. या घडामोडीमुळे आरटीओतील भ्रष्ट मंडळींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संजीवनी चोपडे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.चोपडे येथील प्रादेशिक परिवहन विभागात सहायक मोटरवाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या विभागात एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत लर्निंग लायसन्स घोटाळा झाला होता. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी नागपूर आरटीओत अनेक घोटाळे झाले. प्रचंड वादगस्त असलेला वर्धेचा एक अधिकारी येथे नियुक्त झाला. त्याने भ्रष्टाचाराला रान मोकळे करून दिले होते. काहीही करा, पैसे आणा, बाकी मी बघून घेतो, असे तो खुलेआम म्हणायचा. त्यामुळे लर्निंग लायसन्स, एन्ट्री फी, पासिंगसह अनेक घोटाळे सुरू झाले. त्याचा बोभाटा झाल्याने या अधिकाऱ्याची हकालपट्टी झाली. दरम्यान, आरटीओतील लर्निंग लायसन्सचा घोटाळा उघड झाला. अधिकारी-एजंटसह १३ जणांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात चोपडे यादेखील आरोपी आहेत. गुन्हे शाखेचा आर्थिक विभाग (ईओडब्ल्यू) या घोटाळ्याचा तपास करीत आहे. यापूर्वी तीन एजंटस्ना अटक झाली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे सोमवारी सकाळी चोपडे यांच्या फ्रेण्डस् कॉलनी, गिट्टीखदानमधील घरी त्यांना अटक करण्यासाठी धडकले. त्यांनी चोपडे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या घडामोडीमुळे आरटीओत प्रचंड खळबळ निर्माण झाली.
लर्निंग लायसन्स घोटाळा : नागपूर आरटीओची महिला अधिकारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 9:22 PM
आरटीओतील लर्निंग लायसन्स घोटाळ्यात आरोपी असलेल्या एका महिला आरटीओ अधिकाऱ्याला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सकाळी अटक केली. या घडामोडीमुळे आरटीओतील भ्रष्ट मंडळींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देआरटीओतील भ्रष्ट मंडळीत खळबळ