मुख्याध्यापकावर वाढविताहेत दबाव : शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिकारावरही अतिक्रमण
नागपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना द्यावयाचे मोफत गणवेश ठरावीक पुरवठादाराकडून खरेदी करण्याची छुपी सक्ती पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे नाव सांगून करण्यात येत आहे. पुरवठादार मुख्याध्यापकाला गाठून त्यांच्यावर दबाव आणून पुरवठ्याचे आदेश मिळवून घेत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळाशाळांमध्ये तीन पुरवठादार अतिशय सक्रियतेने पसरले आहेत. ऐनकेन मार्गाने गणवेश खरेदीसाठी दबाव वाढवित आहेत. पुरवठादाराची एवढी मजल जाण्यामागे त्याला नक्कीच पाठबळ मिळत आहे.
गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समितीला निधी उपलब्ध करून देण्यात येतो व शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गणवेश खरेदी केले जातात. याबाबत शासनाकडून वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन निर्णयात गणवेशाचा रंग ठरविणे व खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असल्याची स्पष्ट तरतूद आहे. विशेष म्हणजे यंदा विद्यार्थ्यांना एकच गणवेश मिळणार आहे. त्यासाठी प्रती गणवेश ३०० रुपये दराने निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा झाला आहे. यंदा जि.प.च्या शिक्षण समितीने विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा एकच रंग ठरविला आहे. हा अधिकार नियमात नसला तरी एक चांगला निर्णय आहे. त्या माध्यमातून एकसूत्रता येणार आहे, पण तीन पुरवठादार गणवेश पुरविण्याचे काम मिळावे म्हणून सर्व तडजोडी करीत आहेत. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखाच्या माध्यमातून मुख्याध्यापकांवर दबाव टाकण्यात येत आहे. पुरवठ्याचे आदेश छापून पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे नावाने दबाव टाकून त्यांच्याकडून ऑर्डर मिळवून घेत आहेत.
- गटशिक्षण अधिकाऱ्याकडून सूचना
योजनेकरिता लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता अमुक पुरवठादाराकडूनच गणवेश खरेदी करा, अशा सूचना अमुक पदाधिकारी यांच्या असल्याच्या सूचना काही गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून केंद्रप्रमुखांमार्फत मुख्याध्यापकांना दिल्या जात आहेत, तर काही केंद्रप्रमुख गणवेश खरेदीबाबतच्या ठरावीक पुरवठादारांच्या निविदा मुख्याध्यापकांना पोहोचवून देत आहेत.
- गणवेश खरेदीसाठी छुपी सक्ती केली जात असल्याची माहिती संघटनेकडे आली आहे. जे पुरवठादार विविध माध्यमातून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना प्रशासनाने आळा घालावा.
लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा नागपूर
- जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
मागील वर्षीच तत्कालीन शिक्षण सभापतींनी गणवेशाचा रंग बदलला होता. याला एक वर्षही होत नाही तोच पुन्हा गणवेशाचा रंग बदलण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त होत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रारीही केल्या आहेत.
सतीश तलवारकर, महासचिव, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादल