नागपूर : जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे व स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधतांनाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी येथे केले. न्यूनगंड हा आदिवासींच्या शिक्षणापुढील सर्वात मोठा अडसर असल्याने स्थानिक आदिवासी शिक्षित मुलांकडून प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जावे, अशा सूचनाही राष्ट्रपतींनी यावेळी केल्या.
नागपुरातील राजभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिवासी समुहातील माडिया,कातकरी आणि कोलाम जमातींच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यावेळी उपस्थित होते. ‘शाळेत जायला रस्ते नव्हते, दप्तर नसायचे, डोक्यावर कापडी पोतं पांघरून भर पावसाळ्यात शाळेत जावे लागायचे. पदोपदी संघर्ष होता. दर मजल करत यश संपादन करून शिक्षिका, राज्यपाल आणि देशाची राष्ट्रपती झाले’, अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपला जीवनप्रवास उलगडला. तो ऐकतांना सारेच उपस्थित भारावले होते. देशात एकूण ७०० आदिवासी जमाती असून यातील ७५ जमाती या अतिमागास आहेत. ७०० जमातींच्या १ हजारांहून अधिक बोलीभाषा आहेत. या भाषांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. शासनानेही आदिवासींची सामाजिक स्थिती समजुन घेत त्यानुसार वेळोवेळी योजना व उपक्रमांमध्ये संयुक्तिक बदल करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
- आदिवासींना बोलीभाषेतून मिळावे शिक्षण
गडचिरोली जिल्ह्यातील पहिले आदिवासी डॉक्टर असलेले डॉ.कन्ना मडावी यांनी आदिवासींना त्यांच्या बोलीभाषेत प्राथमिक शिक्षण मिळावे अशी भावना व्यक्त केली. यवतमाळ जिल्ह्यातील डॉ.गंगाधर आत्राम यांनी आदिवासींच्या रोजगाराचा मुद्दा मांडला. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील डॉ.कौशिका भोये यांनी आदिवासींसाठी मोफत, दर्जेदार आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, अशा भावना व्यक्त केली. नीट परिक्षा उत्तीर्ण झालेल्या १० आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून राष्ट्रपतींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी, रेला पारंपरिक आदिवासी नृत्याचे राष्ट्रपतींसमोर उत्तम सादरीकरण झाले. यावेळी माडिया, कोलाम जमातींद्वारा निर्मित वैशिष्ट्यपूर्ण हस्तशिल्पांच्या दालनास राष्ट्रपतींनी भेट दिली.