नागपूर : शिवसेनेने अलीकडे नागपूरवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत हे नागपुरातील गटबाजी नियंत्रणात आणण्याच्या कामाला लागले आहेत. शुक्रवारी रविभवनात बैठक घेत पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे. नवा-जुना वाद सोडा, समन्वयाने काम करा, अशा शब्दात राऊत यांनी बजावले.
शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांविरुद्ध मोर्चा उघडला आहे. काँग्रेसमधून आलेल्या लोकांनाच पद व शासकीय समित्यांवर स्थान दिले जात आहे, असे आरोप केले जात आहेत. राऊत यांच्या मागील दौऱ्यात कार्यकर्त्यांनी उघडपणे याबाबत तक्रारी केल्या होत्या. शुक्रवारी राऊत यांनी दक्षिण, पूर्व व उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रत्येकाशी व्यक्तीश: चर्चा केली. यावेळी त्यांनी जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना पद व समित्यांमध्ये स्थान देण्याचे आश्वासन दिले.
जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केले तर मनपा निवडणुकीमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यानंतर सायंकाळी उत्तर नागपुरातील सभेलाही त्यांनी संबोधित केले.