नागपूर : बहुप्रतीक्षित महापालिका प्रभाग रचनेची आज प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात दिग्गजांचे प्रभाग दुसऱ्यासाठी राखीव झाल्याने त्यांना धक्के बसले, तर दुसरीकडे अनेक जण सुरक्षित असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
आरक्षण सोडत निघताच आता महापालिकेत घमासान होणार आहे. नागपूर महापालिकेच्या एकूण जागांपैकी ३५ आणि अमरावतीत २६ जागा या ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या निवडणुकीची तुलना करता नागपुरात ४१ जागा ओबीसींसाठी राखीव होत्या, त्या आता ३५ वर आल्याने ६ जागांचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे अमरावती महापालिकेची सदस्यसंख्या वाढल्याने ओबीसींना त्याचा फायदा झाला. तेथे पूर्वी २३ जागा ओबीसींसाठी राखीव होत्या. त्यात तीनने भर पडली आहे.
नागपूर महापालिकेत एकूण १५६ नगरसेवक निवडून जाणार आहेत. अनुसूचित जातीसाठी एकूण ३१ जागा आरक्षित असून, अनुसूचित जाती महिलांसाठी १६ जागा आरक्षित आहेत. अनुसूचित जमातीसाठी १२ जागांचे सोडतीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. ७८ जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित केल्या आहेत. ओबीसीसाठी ३५ जागा राखीव असून, त्यापैकी १८ जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत.
अमरावतीच्या एकूण ९८ जागांपैकी २६ जागा ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आल्या असून गतवेळपेक्षा तीन जागा वाढल्या. अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमाती २, सर्वसाधारण ५३ अशा जागांची सोडत निघाली. चंद्रपूर मनपाच्या २७ प्रभागातील ७७ जागांचे आरक्षण ५ ऑगस्टला जाहीर होणार आहे.