नागपूर : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘विद्यार्थी माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. ही जबाबदारी शिक्षण विभागावर दिली आहे. पण नागपूर जिल्हा असो वा विभाग यासंदर्भात कुठल्याही हालचाली दिसून येत नाही. कदाचित नागपूर विभाग या उपक्रमात काढता पाय तर घेत नाही ना? असा सवाल उपस्थित केला जातो.
विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या सुमारे पाच हजार शाळा असून, त्यातून सुमारे दहा लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलात संसर्ग पसरू शकतो, असे भाकीत वर्तविण्यात येत असतानाच, शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमाच्या धर्तीवर ‘विद्यार्थी माझी जबाबदारी’ या मोहिमेची तयारी सुरू केली आहे. यासाठी शिक्षण विभाग शिक्षकांना व पालकांना मुलांची काळजी कशी घ्यावी, याचे धडे देणार आहे. संपूर्ण राज्यात विद्यार्थी माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याने यात १ लाख ९ हजार अंगणवाड्या, ७० हजार ८१२ प्राथमिक व २२ हजार २०४ माध्यामिक व उच्च माध्यमिक शाळा यात सहभागी होणार आहेत. लहान मुलात कोणती लक्षणे असल्यानंतर काय खरबदारी घ्यावी, पालकांनी मुलांचे आरोग्य कसे जपावे, याची माहिती शिक्षकांकडून दिली जाणार आहे. याबाबतचा अहवाल शाळेच्या मुख्याध्यापकांकडून दर आठवड्याला शिक्षणाधिकारी जमा करतील. जे विद्यार्थी ऑनलाईन शाळांना अनुपस्थित राहतील, त्यांच्या पालकांशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली जाणार असून त्यांनाही काय करावे, याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.