नागपूर : मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाचा पाय सासऱ्याने फरशी मारून फ्रॅक्चर केला. ही घटना जाटतरोडी इमामवाडा येथे घडली असून सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
माहितीनुसार, सौरभ ऊर्फ बेसन मसराम (रा. जाटतरोडी इमामवाडा) याचे त्याच्या शेजारीच राहणाऱ्या खुशी नामक तरुणीसोबत सूत जुळले. दोघांनीही प्रेमविवाह केला. यानंतर दोघांचा सुखीसंसार सुरू होता. मात्र, काही दिवसातच संसाराचे ओझे वाटायला लागल्यामुळे दोघांत कुरबूर सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून सौरभ आणि खुशी यांच्यात कौटुंबिक कलहातून वाद सुरू होता. याच कारणातून बुधवारी दोघांत भांडणं झाली
या वादातत सौरभने खुशीला मारहाण केली. याबाबत तिने तिचे वडील बबलू चांदेवार यांना फोन करून झालेला वाद व पतीने केलेल्या मारहाणीबाबत सांगितले. खुशीच्या वडीलांनी लगेच तिचे घर गाठले व सौरभची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सौरभ रागाच्या भरात काही ऐकूनच घेत नव्हता, त्यात जावई-सासरा असा वाद सुरू झाला. इकडे खुशी सौरभला शिवीगाळ करीत होती. तेवढ्यात खुशीचे वडील बबलू चांदेकर यांनी रागात बाजुला असलेली फरशी उचलून सौरभच्या पायावर मारली. यात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला.
याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी खुशी आणि तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर, सौरभचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्याला डॉक्टरांनी चार महिने बेडवर आराम सांगितला आहे.