लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी भारताच्या माजी पंतप्रधानांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केलेला रामटेक हा विदर्भातील लक्षवेधी मतदार संघ आहे. १९८४ आणि १९८९ या दोन निवडणुकांमध्ये पी.व्ही.नरसिंहराव यांनी रामटेक लोकसभा मतदार संघातून नशीब अजमाविले होते. यात रामटेकच्या मतदारांनी त्यांना डोक्यावर घेतले. १९८४ मध्ये नरसिंहराव यांनी रामटेक हा काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदार संघ असल्याने येथून लढले होते. समाजवादी काँग्रेसचे शंकरराव गेडाम हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. या निवडणुकीत ४ लाख ६० हजार ५७० असे एकूण मतदान झाले होते. त्यापैकी नरसिंहराव यांना २ लाख ९० हजार ९०५ मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शंकरराव गेडाम यांना १ लाख ४ हजार ९३३ मते मिळाली होती. पी. व्ही. नरसिंहराव हे १ लाख ८५ हजार ९७२ अशा विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले होते. यावेळी पी.व्ही.नरसिंहराव यांना एकूण मतांच्या ६५ टक्के मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार अरविंद तारेकर होते. त्यांना केवळ २६ हजार ३०१ मते मिळाली होती.या निवडणुकीत एकूण १५ अपक्ष उमेदवार मैदानात होते. रामटेकमधून निवडून येताच नरसिंहराव हे केंद्रात मानव संसाधन मंत्री झाले. १९८९ च्या निवडणुकीत पी.व्ही.नरसिंहराव हे दुसऱ्यांदा रामटेक लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार होते. यावेळी जनता दलाचे पांडुरंग हजारे यांच्याशी त्यांचा सामना झाला. हजारे यांनी नरसिंहराव यांना या निवडणुकीत घाम फोडला. या निवडणुकीत ५ लाख ८९ हजार ९७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी नरसिंहराव यांना २ लाख ५७ हजार ८०० मते मिळाली होती. मतांची ही टक्केवारी ४५.४५ होती. पांडुरंग हजारे यांना २ लाख २३ हजार ३३० मते मिळाली होती आणि मतांची टक्केवारी ३९.३८ होती. नरसिंहराव यांचा ३४ हजार ४७० मतांनी निसटता विजय झाला होता. तिसºया क्रमांकावर खोरिपचे पृथ्वीराज बोरकर होते, त्यांना २१ हजार १४० मते मिळाली होती. बसपाचे मा.मु.देशमुख यांनी १५ हजार ८५१ मते मिळवीत काँग्रेसच्या मताधिक्क्याला येथे ब्रे्रक लावला होता, हे विशेष. यानंतर आंध्र प्रदेशच्या नडियाल लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व करीत नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले. ते २१ जून १९९१ ते १६ मे ११९६ या काळात पंतप्रधान होते.
रणभूमीतील दिग्गज; रामटेकच्या गडावर पी. व्ही. नरसिंहराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:30 AM