नागपूर : गाड्यांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. परिवहन खात्यामध्ये हॉर्नच्या आवाजासंदर्भात कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याचे लक्षात आले आहे. त्यावर बराच विचार केल्यानंतर हॉर्नचे आवाज मंजूर करून त्यात भारतीय वाद्यांचा उपयोग कसा करता येईल व आवाजाची तीव्रता कमी कशी राखता येईल यांसदर्भात कायदा करण्याचा विचार सुरू असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्या ध्वनिप्रदूषण जागरुकता अभियानाचे उद्घाटन शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला नितीन मुणोत, विश्वास सहस्त्रभोजनी, मनीष वझलवार, अनिरूद्ध भांडारकर, प्रवीण बावनकुळे, विवेक गर्गे, सुभाष कासनगोट्टीवार, विजय अग्रवाल यांच्यासह ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले उपस्थित होते.
भविष्यात इलेक्ट्रिक बाईक, स्कूटर, कार यांना प्रोत्साहन देण्यात येणार असून त्यामुळे गाड्यांच्या किमती कमी होतील आणि पेट्रोल, डिझेलचा वापर कमी झाल्यामुळे प्रदूषण कमी होईल. ग्रीन हायड्रोजनसंदर्भात धोरण तयार केले जात असून त्यामाध्यमातून जलप्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
एम्सच्या महावृक्षारोपण कार्यक्रमात गडकरी यांनी ध्वनिप्रदूषणावर काम करायचे आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनने ही मोहीम चालू केली आहे. पुढील टप्प्यात ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर जनजागृतीसाठी गाड्यावर ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे स्टीकर लावण्यात येणार आहेत, असे प्रा. अनिल सोले यांनी सांगितले. यावेळी
कार्यक्रमाला कौस्तुभ चॅटर्जी, विजय घुगे, योगेश बन, भोलानाथ सहारे, आशीष वांदिले, चेतन कायरकर, बंटी मेश्राम, प्रशांत कामडे, प्रवीण बावनकुळे, अनुप खंडेलवाल आदी उपस्थित होते.