जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीच्या वर्षभरापूर्वी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिल्ह्यातील सहा आमदारांसाठी ‘मिनी विधानसभा’ ठरणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची अग्निपरीक्षा पास करण्यासाठी आमदारांनी कंबर कसली आहे. नागपूर जिल्ह्यात ७६८ पैकी ३८१ ग्रामपंचायतींमध्ये सप्टेंबर महिन्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. जिल्ह्यातील तेराही तालुक्यात निवडणुका होत असल्याने राजकीय पक्षही या निवडणुका विधानसभेची ट्रायल म्हणून लढतील. राजकीयदृष्ट्या विचार केल्यास जिल्ह्यावर सध्या भाजपाची पकड आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बजेटमध्ये गत चार वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासपर्वाला सामोरे जात ग्रामपंचायतीचा आखाडा मारण्यासाठी विरोधी पक्षांचा कस लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका साधरणत: स्थानिक विकासाचे मुद्दे आणि स्थानिक राजकारणावर होत असतात. मात्र देशात आणि राज्यात चार वर्षापूर्वी झालेला सत्ताबदल, गावागावापर्यंत पोहोचलेली मोदी लाट अद्यापही कायम आहे का? हे या निवडणुकीच्या माध्यमातून पाहावयास मिळेल. राज्यात आणि नागपूर जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात यश आले होते. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्र भाजपसोबत असल्याचे दिसून आले. नागपूर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात वर्षभरात जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे विधासभा आणि जि.प. निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष ग्रा.पं.च्या निवडणुका प्रतिष्ठेच्या करतील, असा राजकीय अंदाज आहे.कामठीची कमांड कुणाकडे?भाजपाचे संघटनात्मक नेटवर्क तगडे असलेल्या कामठी तालुक्यातील ४७ पैकी ११ आणि मौदा तालुक्यातील ६३ पैकी ३१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. या मतदारसंघातील ग्रामपंचायतींवर ताबा मिळविताना काँग्रेस आणि विरोधी पक्षाला निश्चितच घाम फुटेल. मात्र नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाला धक्का दिल्यानंतर विरोधकांची येथे छाती फुगली होती, हे विशेष. २०१४ मध्ये भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉँग्रेसचे राजेंद्र मुळक यांचा तब्बल ४० हजार २ मतांनी पराभव करीत कामठीत विकासाची नवऊर्जा भरली होती. सध्या मुळक यांनी रामटेकमध्ये घरोबा केल्याने येथे काँग्रेसला मधल्या काळात कुणी वाली नव्हते. सध्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांनी विधानसभेसाठी दंड थोपटल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे यांच्या मतदारसंघात खिंडार पाडताना त्यांना कस लागणार आहे.विधानसभा २०१४चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा) - १,२६,७५५राजेंद्र मुळक (काँग्रेस) - ८६,७५३काटोलात देशमुखी लढतकाटोल तालुक्यातील ८३ पैकी ५३ ग्रामपंचायतीत तर नरखेड तालुक्यात ७० पैकी ३० ग्रामपंचायतीत सप्टेंबरमध्ये निवडणूक होईल. राजकीयदृष्ट्या विचार केल्यास ही निवडणूक विद्यमान आमदार आशिष देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुखांसाठी प्रतिष्ठेची असेल. तसे वातावरण सध्या या मतदार संघात दिसून येत आहे. परवा जलालखेडा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत झालेल्या वादानंतर या दोघांनी थेट ग्रामसभा स्थळ गाठले होते. त्यामुळे ग्रा.पं. निवडणुकीत येथे देशमुखी लढतील होतील. मात्र वर्षभरापासून आशिष देशमुख यांनी भाजपवर तोफ डागली असल्याने यावेळी या मतदारसंघात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतचे मतदार भाजपाबरोबर जातील की राष्ट्रवादीच्या घडीचा येथे पुन्हा गजर होईल, हे लवकरच पाहावयास मिळेल.विधानसभा २०१४आशिष देशमुख (भाजपा) - ७०,३४४अनिल देशमुख (राष्ट्रवादी) - ६४,७८७रामटेकमध्ये कुणाचे सिंचन ?शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणाऱ्या पाणी प्रश्नावर राजकीय वातावरण तापले असलेल्या रामटेक तालुक्यातील ४८ पैकी २८ तर पारशिवनी तालुक्यातील ५१ पैकी १९ ग्रामपंचायतीत निवडणुका होत आहेत. २०१४ मध्ये येथे भाजपाचे मलिकार्जुन रेड्डी यांनी शिवसेनेचे अॅड.आशिष जयस्वाल यांचा पराभव करीत रामटेकचा गड सर केला होता. मात्र येथे ग्रामीण भागात आजही सेनेची पकड आहे. लोकसभेत सेनेचे कृपाल तुमाने यांनीही बाजी मारली होती. यातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुळक यांनी विधानसभेसाठी या मतदारसंघात संघटनबाधणीचे काम सुरु केल्याने सेनेची पकड असलेल्या या मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत येथे विजयाचे शिवधनुष्य कोण पेलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.विधानसभा २०१४मल्लिकार्जुन रेड्डी (भाजपा) - ५९,३४३आशिष जयस्वाल (शिवसेना) - ४७,२६२उमरेडमध्ये कुणाची पंचायत ?ग्रामस्वराज्याचे धडे घेत असलेल्या उमरेड तालुक्यातील ४७ पैकी २६, भिवापूर तालुक्यातील ५६ पैकी ३६ आणि कुही तालुक्यातील ५८ पैकी २२ ग्रामपंचायतीत निवडणुका होतील. राजकीयदृष्ट्या परिपक्व मतदार असलेल्या या मतदार संघात २०१४ मध्ये भाजपाचे सुधीर पारवे यांनी बसपाचे वृक्षदास बनसोड यांचा पराभव केला होता. गोकुल खाण सामूहिक बलात्कारानंतर हा तालुका सध्या राज्यभरात चर्चेत आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले होते. मात्र मतांच्या राजकारणात या मतदारसंघातील ग्रामस्थ कुणाला कौल देतात, हे पाहणे गरजेचे आहे. कारण विद्यमान जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांची या मतदार संघावर पकड आहे. काँग्रेसचे संघटन त्यांनी येथे बांधले आहे. ते तोडण्यासाठी राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये तिथे अधूनमधून जात असले तरी सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीत घरोबा असल्याने पंचायत राजचे धडे गिरविणाऱ्या या मतदार संघात मतदार कुणाची पंचायत करतात, हे सप्टेंबरचे निकालच सांगतील.विधानसभा २०१४सुधीर पारवे (भाजपा) - ९२,३९९वृक्षदास बन्सोड (बसपा) - ३४,०७७
सावनेरात शेर कोण ?सावनेर विधानसभा क्षेत्रातील सावनेर तालुक्यातील ७५ पैकी २७ , कळमेश्वर तालुक्यातील ५० पैकी २२ ग्रामपंचायतीत निवडणुका होतील. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसने हा मतदारसंघ मोदी लाटेतही कायम राखला होता. यामागील राजकीय कारण वेगळे असले तरी ग्रा.पं. निवडणुकीत सावनेरात शेर कोण?, हा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत सेनेचे विनोद जीवतोडे यांनी केदार यांना घाम फोडला होता. भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने जिल्ह्यात हा मतदारसंघ राखण्यात काँग्रेसला यश आले होते. मात्र या मतदारसंघात ग्रामपंचायतीमध्ये अद्यापही काँग्रेसची पकड असल्याने येथे सत्ताधारी भाजपाला विजयासाठी कंबर कसावी लागणार आहे.विधानसभा २०१४सुनील केदार (काँग्रेस) - ८४,६३०विनोद जीवतोडे (शिवसेना) - ७५,४२१
हिंगण्यात पाटीलकी कुणाची?नागपूर शहरालगत लागून असलेल्या हिंगणा मतदारसंघातील ५३ पैकी ४१ ग्रामपंचायतीत निवडणूक होत आहे. या मतदारसंघात नागपूर तालुक्याचाही काही भाग मोडतो. हिंगण्यात २००९ मध्ये भाजपचे विजय घोडमारे (पाटील) राष्ट्रवादीचे माजी मंत्री रमेश बंग यांना धक्का देत मतदारसंघात पाटीलकी शाबूत ठेवली होती. २०१४ मध्ये भाजपने येथे समीर मेघे यांना संधी दिली. याही निवडणुकीत यंग ब्रिगेड मेघे यांच्यासोबत राहिल्याने बंग पराभूत झाले होते. मात्र पराभवाच्या मंथनानंतर राष्ट्रवादी या मतदारसंघात सक्रिय झाल्याचे दिसून येते. ती किती सक्रिय झाली हे ग्रा.पं. निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मेघे यांनी हा तालुका पाणीदार केला, हे विशेष.विधानसभा २०१४समीर मेघे (भाजपा) - ८४,१३९रमेशचंद्र बंग (राष्ट्रवादी) - ६०,९८१