नागपूर : येत्या १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. विधानभवनापासून रविभवन, आमदार निवासला नवीन लूक देण्यात आला आहे. उद्या, शनिवारपासून नेत्यांचे पोहोचणे सुरू होणार आहे. या अंतर्गत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या उद्या (१७ डिसेंबर) नागपुरात येत आहेत, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे रविवारी येत आहेत.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शनिवारी सकाळी ७.२५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. यानंतर त्या थेट रविभवनला जातील. येथे त्या शिवसेना पदाधिकारी व काही महत्त्वपूर्ण लोकांशी चर्चा करतील. त्याचप्रकारे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे रविवारी येतील.
रविवारी दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष नार्वेकर व विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे हे अधिवेशनासंदर्भातील आढावा बैठकीला उपस्थित राहतील. यानंतर ते विधान भवन परिसराची पाहणी करतील. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा उपाध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील.
मुंबईत आयोजित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे बहुतांश नेते रविवारीच नागपूरला येतील. भाजप व शिंदे गटातील नेत्यांचे शनिवारपासून आगमन होईल.