कमल शर्मा
नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात २० सदस्य असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव अन्य कर्मचाऱ्यांना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काही कॉटेज व क्वार्टर देण्यात आले आहे. बहुतेक जणांची राहण्याची व्यवस्था मंत्र्यांसाठी आरक्षित रवी भवन येथे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयासाठी रवी भवन येथे दोन कॉटेच दिले आहे. फडणवीस यांना देवगिरीसोबतच पालकमंत्री म्हणून रवी भवन येथील कॉटेज क्रमांक-५ देण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यमंत्र्यांचे निवास स्थान असलेल्या नाग भवन येथील कॉटेज उपलब्ध करण्याची मागणी विविध राजकीय पक्षाच्या प्रतोदांनी केली आहे.
रवी भवन येथे एकूण ३० कॉटेज आहेत. यातील सहा कॉटेज विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती, उपसभापती व दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते यांच्यासाठी आरक्षित असतात. रवी भवन येथील उर्वरित शिल्लक २४ कॉटेज कॅबिनेट मंत्र्यांसाठी असतात. शिंदे यांच्यासाठी रामगिरी तर फडणवीस यांच्या करिता देवगिरी बंगला आधीच आरक्षित आहे. त्यामुळे अन्य १८ मंत्र्यांसाठी रवी भवन येथे २४ कॉटेज आहेत. राज्यमंत्र्यांसाठी नाग भवन येथे १६ कॉटेज आहेत. मात्र, सध्या मंत्रिमंडळात कोणीही राज्यमंत्री नाही. यामुळे विविध पक्षाच्या प्रतोदांनी येथील कॉटेजची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या स्टाफसाठी रवी भवन येथील क्वार्टर क्रमांक १ ते ५ देण्यात आले आहे. बांधकाम मंत्र्यांच्या मागणीनुसार आता क्वार्टर क्रमांक १ व २ त्यांना उपलब्ध करण्यात आले आहे. सुयोग, रवी भवन चे बी-टाइप निवास, सरपंच निवास व सिंचन विभागाचे विश्राम गृह उपमुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या स्टाफसाठी कुठे-कुठे व्यवस्था
रवी भवन येथील कॉटेज क्रमांक २९ व ३० मुख्यमंत्री कार्यालयासाठी उपलब्ध केले आहे. कॉटेज क्रमांक ७ ते १२ त्यांच्या सचिवांना मिळाले आहे. याशिवाय वन विभागचे जुने विश्रामगृह येथील सूट क्रमांक १०१, १०२ रवी भवन येथील कक्ष क्रमांक २०, ७, ४७, ३२, ३९, ३८, ५१, ५२, ११, १२, २२, ४० दूर संचार विहार येथील सूट क्रमांक १ व २ सोबतच सुयोग येथील पाच कक्ष व रामगिरी बंगला क्रमांक २७/१ मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहे. १६० गाळे येथील बॅरेक क्रमांक ६ तील खोली क्रमांक ७ ते ९ व रवी नगरचे बी टाइप निवासाची अतिरिक्त मागणी केली आहे.