ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा : सेवाग्राम बापुकुटीच्या धर्तीवर नियोजन
नागपूर : ज्येष्ठ नागरिकांना आपली प्रकृती नीट राखण्यासाठी फिरण्याची गरज भासते. ज्येष्ठ नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन महा मेट्रोच्या वतीने वर्धा मार्गावरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशन परिसरात सेवाग्रामच्या धर्तीवर बापू कुटीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
महा मेट्रोने एअरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे साकारलेल्या बापुकुटीला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. येथील विरंगुळा केंद्रालाही नागरिकांची पसंती मिळत आहे. सकाळ आणि सायंकाळी नियमित फेरफटका मारण्यासाठी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येत आहेत. येथील विरंगुळा केंद्रात चांगली पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. येथे पुस्तके उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक नागरिकांना वाचनाची सवय लागली आहे. येथे महात्मा गांधी यांच्यावरील पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. तसेच शिवाजी महाराज, स्वामी विनेकानंद, विनोबा भावे यांच्या जीवनावरील तसेच साहित्याची पुस्तके उपलब्ध आहेत. हे वाचनालय नि:शुल्क असून त्यासाठी सभासद होणे गरजेचे नाही. परिसरात वॉकिंग ट्रॅक, वाचनालय, बसण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. महा मेट्रोच्या वतीने प्रत्येक दिवशी मेट्रो स्टेशन व मेट्रो रेल्वे येथे सॅनिटाईज करण्यात येते. हे विरंगुळा केंद्र सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान नागरिकांसाठी खुले आहे. नागरिकांनी या विरंगुळा केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन महा मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.
...........