नागपूर : उन्हाळा तापायला लागला की लिंबूच्या मागणीत साहजिकच वाढ हाेते. उन्हातून आल्यावर लिंबूपाणी किंवा सरबताचा गारवा ताप शमविण्यास दिलासादायक ठरताे. मात्र, यावेळी मागणी वाढण्याचे कारण वेगळे आहे व ते म्हणजे काेराेनाचे हाेय. लिंबूच नाही तर संत्रा आणि माेसंबीचीही मागणी वाढली आहे. काेराेनाविरुद्ध राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ही फळे प्रभावी ठरत असल्याने अनेकांच्या राेजच्या आहारात यांचा समावेश हाेत आहे. मागणी असल्याने दरही दुपटीने वाढले आहेत. मात्र, पुरवठा कमी हाेत असल्याने तिही चिंता व्यापाऱ्यांना लागली आहे.
दरवर्षी जानेवारीपासून संत्र्याची माेठ्या प्रमाणात आवक हाेत असते. नागरिकांच्या आहारात संत्र्याचा समावेश असल्याने त्याला मागणी असते; पण सध्या काेराेनामुळे लाेकांमध्ये अधिक जागृती येत असल्याचे दिसते. त्यामुळे यावेळी संत्रा, माेसंबीकडे लाेकांचा अधिक कल वाढल्याचे संत्रा विक्रेत्यांनी सांगितले. एकीकडे मागणी दुपटीने वाढली आणि आवकही कमी असल्याने संत्रा, माेसंबीचे दर दुपटीने वाढल्याचे ठाेक व्यापारी राजेश छाबरानी यांनी सांगितले.
महिन्याचे दर संत्रा माेसंबी लिंबू
जानेवारी-फेब्रुवारी ४०-५० २५-३०
मार्च ६०-७० ५०-६०
एप्रिल ८०-१०० ७०-८०
यावर्षी आवक घटली
राजेश छाबरानी यांनी सांगितले, विदर्भात नागपूर, अमरावती आणि काही प्रमाणात मध्यप्रदेशातून संत्र्याची आवक हाेते. माेसंबी आंध्र प्रदेशातून आणली जाते. यावर्षी माेसंबीची आवक सामान्य आहे; पण मागणी वाढल्याने दर वधारले आहेत. मात्र, संत्र्याचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटले आहे. उत्पादन घटल्याने संत्र्याची आवक खूप कमी झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांजवळ माल कमी आला आहे. ग्राहकांची निराशा हाेत आहे. लिंबूची आवक नागपूर जिल्ह्यातूनच हाेते व ती सामान्य आहे.
संत्रा, माेसंबी व लिंबू ही लिंबूवर्गीय फळे असल्याने त्यात व्हिटॅमिन-सी चे प्रमाण अधिक असते, जे राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यास लाभदायक आहे. लिंबाचा रस गूळ किंवा खडीसाखर टाकून घेतल्यास सर्दीसाठी उत्तम ठरताे. उन्हाळ्यात ताप शमविण्यासाठीही ते चांगले असतात.
- प्राची माहूरकर, वनस्पती तज्ज्ञ
काेराेनाच्या नवीन स्ट्रेनमध्ये डाेळे येणे, लूज माेशन, पाेटदुखी यासारखी लक्षणे असल्याचे दिसून येत आहे. यासाठी लिंबू आणि माेसंबीचा ज्यूस लाभदायक ठरताे. सर्दीने नाक बुजले असल्यास तिन्ही फळांचा रस खडीसाखर टाकून दिल्यास नाक खुले करण्यास मदत हाेते. शिवाय पचन क्षमता वाढविणे, भूक लागणे व राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यास तिन्ही फळे लाभदायक आहेत. मात्र, आंबटपणा असल्याने कफ वाढण्यासही कारणीभूत ठरतात. त्यामुळे आहारात त्यांचे प्रमाण अधिक नसावे, याची काळजी घेणेही गरजेचे आहे.
- डाॅ. गायत्री खुरसुंगे, आयुर्वेद तज्ज्ञ