नागपूर : अजून उन्हाळ्याला सुरुवात झाली नसली तरी लिंबूचे भाव अचानक वाढले आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लिंबाचे दर शेकडा ३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. किरकोळमध्ये तर विक्रेते मोठ्या आकाराचे लिंबू १० रुपयांना दोन व लहान आकाराचे १० रुपयांना तीन विकत आहेत. उन्हाच्या झळा सुरू होताच भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कळमना मार्केटमध्ये २०० रुपये शेकडा
- कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबू २०० रुपये शेकडा दराने विकले जात आहेत. तर किरकोळ विक्रेते वस्तीमध्ये ३०० ते ४०० रुपये शेकडा दराने विकत आहेत.
लिंबू का महागले ?
- गेल्यावर्षी मान्सून चांगला बरसला; पण सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने लिंबाच्या बागांचे नुकसान झाले. आता ऊन तापण्यास सुरुवात झाली असल्याने मागणी वाढू लागली आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी झाल्याने लिंबाचे दर वाढत आहेत, असे महात्मा फुले अडतीया असोसिएशनचे सचिव रामभाऊ महाजन यांनी सांगितले.
पालेभाज्या स्वस्त; पत्ताकोबी १० रुपये किलो
- या आठवड्यात पालेभाज्या तुलनेत स्वस्त झाल्या आहेत. पालकचा भाव १० रुपये किलोपर्यंत उतरला आहे. पत्ताकोबी १० रुपये तर फुलकोबी १० ते १५ रुपये किलोने विकला जात आहे.
असे आहेत भाज्यांचे दर
- पालक - १० ते १२ रुपये
- फुलकोबी - १० ते १५ रुपये
- पत्ताकोबी - १० ते १२ रुपये
- टमाटर- १० ते १५ रुपये
- सांभार - १५ ते २० रुपये
- हिरवी मिरची - २५ ते ३० रुपये
- मेथी - २० ते ३० रुपये
- कांदे - २० ते २५ रुपये
- आलू - २० ते २२ रुपये
गृहिणी म्हणतात...
लिंबाचे दर अचानक वाढले आहेत. आता दुकानदार १० रुपयांना दोन लिंबू देत आहेत. उन्हाळ्यात तर दर आणखी वाढतील. मुलांना उन्हाळ्यात लिंबू पाण्याचा आधार असतो. आतापासूनच दर वाढत असल्यामुळे उन्हाळ्यात लिंबू खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल, असे दिसते.
- सरोज वानखेडे, छत्रपतीनगर